नवी मुंबईचा ‘आंतरराष्ट्रीय शहर’ हा लौकिक वाढीस लागावा याकरिता सिडको सातत्याने प्रयत्नशील असते. सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई मेट्रो, नैना शहर, कॉर्पोरेट पार्क हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे नगर विकास क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार असून देशाच्या आर्थिक विकासातही मोलाची भूमिका पार पाडणार आहेत.

या प्रकल्पांप्रमाणेच परिवहन, पाणी पुरवठा, क्रीडा, वाणिज्यिक इ. मूलभूत सोयी सुविधांशी संबंधित प्रकल्पही सिडकोतर्फे साकारण्यात येत आहेत. नगर नियोजन क्षेत्रात अद्वितीय ठरणाऱ्या सिडकोच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांबाबत माहिती आपण जाणून घेऊया..

नवी मुंबईतील सध्या अस्तित्वात असलेल्या सार्वजनिक वाहतुकीच्या साधानांवरील ताण कमी करून नवी मुंबईतील सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सक्षम व्हावी, या उद्देशाने नवी मुंबईमध्ये मेट्रो मार्ग विकसित करण्याची संकल्पना पुढे आली. नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालावर ( डीपीआर) आधारित बेलापूर खारघर पेंधर – तळोजा एमआयडीसी – कळंबोली – खांदेश्वर या एकूण 26.26 कि.मी.चा उन्नत मार्ग नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत (नमुंआंवि) विस्तार करावयाचा असून तो टप्प्या टप्प्याने (चार मार्गिका) करण्यात येणार आहे.

मार्ग 1 : सीबीडी बेलापूर ते पेंधर हा (11 – स्थानके असणारा) 11.10 किमीचा मार्ग आणि तळोजा – पंचनंद येथे आगार तथा कार्यशाळा हा मार्ग सध्या प्रवाशांसाठी खुला झाला आहे.

स्टेशन्स :- बेलापूर टर्मिनल, RBI कॉलनी, बेलपारा, उत्सव चौक, केंद्रीय विहार, खारघर गाव, सेंट्रल पार्क, पेठपारा, आमदूत, पेटली – तळोजा आणि पेंधर मेट्रो स्टेशन आहेत.

टाइम टेबल :- सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत दर 15 मिनिटांनी मेट्रो धावत असून पेंधर ते बेलापूर टर्मिनलपर्यंत दर 15 मिनिटांनी मेट्रो सेवा उपलब्ध आहे

मार्ग – 2 : खांदेश्वर ते तळोजा एमआयडीसी हा ( 6 स्थानके असलेला) 7.12 किमीचा मार्ग

मार्ग – 3 : पेंधर ते तळोजा एमआयडीसी हा (3 स्थानके असलेला) 3.87 किमी चा मार्ग

मार्ग – 4 : खांदेश्वर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (नमुंआंवि) हा (1 स्थानक असलेला) 4.17 किमी चा मार्ग

मार्ग क्र. 1 ची अंमलबजावणी..

पहिल्या टप्प्यात सिडकोतर्फे मार्ग क्र. बेलापूर ते पेंधर मार्गिकेचे काम हाती घेण्यात आले होते. या मार्गाकरिता खर्चाचे 100 % योगदान सिडकोतर्फे देण्यात आले. मार्ग क्र. 1 ची अंमलबजावणी करण्यासाठी सिडकोतर्फे अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून महा मेट्रोची नियुक्ती करण्यात आली होती. राज्य आणि केंद्र शासनाच्या संयुक्त मालकीची कंपनी असलेल्या महा मेट्रोने नागपूर मेट्रोच्या टप्पा -1 ची यशस्वीरीत्या अंमलबजावणी केली असून पुणे मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्र. 1 व 2 च्या उभारणीसह परिचालन आणि देखभालीचा अनुभव महा मेट्रोला आहे. मार्ग क्र. 1 ची अंमलबजावणी करताना दोन पॅकेजेस अंतर्गत मुख्य व्हायाडक्टचे काम, डेपो अप्रोच व्हायडक्ट, डेपोसह कार्यशाळा ही तांत्रिक कामे पूर्ण करण्यात आली.

तसेच या मार्गावर बेलापूर टर्मिनल, आरबीआय कॉलनी, बेलपाडा, उत्सव चौक, केंद्रीय विहार, खारघर व्हिलेज, सेंट्रल पार्क, पेठपाडा, आम्रदूत, पेठाली – तळोजा आणि पेंधर या 11 स्थानकांची उभारणी करण्यात आली. मार्ग क्र. 1 वर धावणाऱ्या मेट्रोच्या ऑसिलेशन, विद्युत सुरक्षा व सर्वात महत्त्वाचा टप्पा असलेली CMRS (मेट्रो रेल सुरक्षा आयुक्त) चाचणी यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर CMRS यांच्याकडून प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते दि. 12 जानेवारी, 2024 रोजी नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा संपन्न होऊन नवी मुंबईतील नागरिकांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण झाले. मेट्रो सुरू झाल्याच्या दिवसापासून नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मेट्रोला लाभत आहे.

नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये :-

अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वातानुकूलित डबे
नवी मुंबईतील नोड्स परस्परांशी अधिक सुलभतेने जोडले जाणार
दक्षिण नवी मुंबईतील नोड्सच्या विकासाकरिता योगदान देणारा प्रकल्प
परवडणाऱ्या दरातील आरामदायी आणि निसर्गरम्य प्रवास

नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहराचा लौकिक प्राप्त करून देण्यामध्ये सिडकोचे महत्त्वाचे योगदान आहे. नवी मुंबईमध्ये पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करून या शहराची वाटचाल सदैव विकास पथावरून कशी होईल, याकडे सिडकोने नेहमीच लक्ष पुरविले आहे. परंतु, एवढ्यापुरतीच आपली भूमिका मर्यादित न ठेवता, आपल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्पांद्वारे नवी मुंबईची जागतिक स्तरावर स्वतंत्र आणि सन्मानपूर्वक ओळख निर्माण करण्याकरिता सिडकोने नियोजन केले आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबईतील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याकरिताही सिडको सदैव कटिबद्ध आहे.

एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य)

राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली सिडकोतर्फे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना, मेट्रो, कॉर्पोरेट पार्क इ. महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यात येत आहेत. हे प्रकल्प साकारत असताना उत्तम दर्जाच्या मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यावरही सिडकोने लक्ष केंद्रीत केले आहे. भविष्यातील नवी मुंबईची पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी नवीन योजना राबविण्यात येत आहेत. तसेच शहरांतर्गत उत्तम कनेक्टिव्हिटी निर्माण व्हावी याकरता मेट्रोसोबतच परिवहनाचे अन्य प्रकल्पही राबविण्यात येत आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांचे बांधकाम करण्याबाबतही सिडको अग्रेसर आहे.

अनिल डिग्गीकर (व्यवस्थापकीय संचालक सिडको)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *