Take a fresh look at your lifestyle.

भारतातला सर्वात लांब समुद्री पूल होणार खुला, 22Km अंतरासाठी 18,000 कोटींचा खर्च, मुंबई ते पुणे गाठता येणार फक्त 90 मिनिटांत..

तब्बल 4 वर्षांपासून मुंबईकर वाट पाहत असलेल्या देशातील सर्वात लांब मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडचे बांधकाम अखेर पूर्ण झालं आहे. मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास करण्यासाठी सध्या काही तास लागतात, परंतु मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड (MTHL) प्रोजेक्टमुळे मुंबईतील शिवडी ते नवी मुंबईतील चिर्ले प्रवास अवघ्या 20 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.

या प्रकल्पाचे सुमारे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. या वर्षाच्या अखेरीस हा संपूर्ण प्रकल्प सुरू होणार आहे. सुमारे 22 किलोमीटर लांबीचा हा पूल देशातील सर्वात लांब सागरी सेतू आहे, MTHL ची एकूण लांबी 22 किमी असेल, ज्यामध्ये 5.5 किमी जमिनीवरील नाल्यांना जोडले जाईल, तर समुद्रावरील पुलाची लांबी 16.5 किमी असणार आहे.

ज्यामध्ये अनेक तंत्रांचा वापर करण्यात आला आहे. या पुलावर ओपन रोड टोलिंग (ORT) यंत्रणा असेल, या मुळे ये – जा करणाऱ्या वाहनांना टोल बूथवर वाहनाचे स्पीड कमी करण्याची गरज भासणार नाही. टोल बूथमधून जात असताना, तुम्ही ताशी 100 किलोमीटर वेगाने जाऊन टोल भरू शकता..

एकूण 6 लेनच्या या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर एका दिवसात 70 हजार वाहने या पुलावरून जाऊ शकणार आहे. सध्या या पुलाची रचना पूर्णपणे तयार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या पुलाची पाहणी केली आहे.

MMRDA चे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास म्हणाले, “सध्या 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. संरचनात्मक काम पूर्ण झाले आहे. आम्ही बुधवारी मुख्य भूभाग मुंबईशी जोडणार आहोत.. त्याचबरोबर हा प्रकल्प या वर्षी डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचे दोन वर्षांपूर्वी ठरवलेले उद्दिष्ट गाठणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

एकूण 18,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या MTHL पुलामध्ये सर्वात लांब ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक वापरण्यात आला आहे. हा पूल बांधल्यानंतर मुंबई – पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूककोंडीची समस्याही सुटणार असून मुंबई – पुणे, गोवा आणि नागपूर हे अंतरही कमी होणार आहे मुंबईतून अवघ्या 90 मिनिटांत पुणे गाठता येणार आहे. या पुलामुळे सुमारे 30 ते 40 टक्के इंधनाची बचत होणार आहे..

मुंबई ते नवी मुंबई दरम्यानची वाहतूक वेगवान करण्यासाठी आणि मुंबई ते पुणे आणि गोव्याकडे जाणारी वाहतूक सुलभ करण्यासाठी सुमारे 30 वर्षांपूर्वी MTHL ची योजना करण्यात आली होती. नोव्हेंबर 2017 मध्ये MMRDA ने या प्रकल्पाचा पुरस्कार केला होता.

त्याचे बांधकाम एप्रिल 2018 मध्ये सुरू झाले. हे पूर्ण करण्यासाठी 4.5 वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. परंतु, कोविड -19 महामारीमुळे बांधकामास सुमारे आठ महिने उशीर झाला आणि सध्या डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.