One Nation One Fertilizer : देशात ‘एक देश एक खत’ योजनेला सुरुवात, काय आहे योजना ? शेतकऱ्यांना कसा मिळणार लाभ, पहा सर्वकाही…

0

शेतीशिवार टीम : 28 ऑगस्ट 2022 :- देशात विविध कंपन्यांच्या माध्यमातून खते बनवले जातात. प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे पॅकिंग, वेगवेगळे ब्रॅण्डिंग असल्याने एकच खत वेगवेगळ्या कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या दराने विकतं असल्याने या सर्वांमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना प्रश पडतो की, कोणती खते वापरायची ? दरांमध्ये इतका फरक का ? खतामध्ये नेमका काय फरक आहे ?

याचबरोबर आपण जर पाहिलं तर शासनाच्या माध्यमातून खतांना सबसिडी दिली जाते ती सबसिडीची रक्कम ही खताच्या किमती पेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात असते. तरीसुद्धा कंपन्याचा या खताच्या ब्रॅण्डिंगवर आपलं प्रभुत्व आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमधील संभ्रमावस्था दूर करण्यासाठी किंवा संपूर्ण देशामध्ये खताचं एकच ब्रॅण्डिंग ठेवण्यासाठी जून 2022 मध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून ”एक देश एक खत” । ”एक राष्ट्र एक उर्वरक” अशा प्रकारची योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. या योजनेला प्रधानमंत्री जन उर्वरक योजना असं नाव देण्यात आलं आहे.

याच योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून देशातील ज्या महत्वाच्या खत कंपन्या आहेत अशा सर्व कंपन्यांसाठी एक नवीन गाईडलाईन पत्रक शासनाच्या माध्यमातून काढण्यात आलेलं आहे. या योजनेची अंमलबजावणी 2 ऑक्टोबर 2022 मध्ये गांधी जयंतीपासून केली जाणार आहे. याची शाश्वती प्रत्येक कंपनीने आपल्या माध्यमातून घेऊन याची तयारी करावी अशा प्रकारचे आदेश देण्यात आले आहेत.

त्यामुळे आता प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक परियोजना (PMBJP) नावाच्या खत अनुदान योजनेअंतर्गत ‘खते आणि लोगोसाठी एकच ब्रँड’ सादर जाणार असून या योजनेअंतर्गत, युरिया (Urea) , डीएपी (DAP) एमओपी (MOP) आणि एनपीके (NPK) एकाच ब्रँड नावाने उपलब्ध होतील. सर्व खत कारखाने, राज्य व्यापारी कंपन्या आणि खतांच्या विपणन कंपन्यांनाही शासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. कंपन्यांना सर्व प्रकारची खते एकाच लोगोप्रमाणे एका गोणीत विकण्यास सांगण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना काय फायदा होणार ?

या योजनेत खताची सर्व पोती सारखीच असणार आहे. सर्व पोती सारखीच असल्याने त्यांची ओळख पटवणे सोपे जाईल. हे खत अनुदानित आहे का ? हे या पोत्यांवरूनच कळणार आहे. या खतांचा वापर फक्त शेतीच्या कामांसाठी करायचा असून जर कोणी त्याचा काळाबाजार करत असेल तर त्याला ओळखणेही सोपं जाणार आहे.

खताची चोरी कशी थांबणार ?

खताच्या गोणीवर एका बाजूला दोन तृतीयांश भागावर नवीन ब्रँड आणि लोगोचा उल्लेख असेल. दुसरीकडे, उर्वरित एक तृतीयांश भागात, कंपनी आणि खताचे डिटेल्स आणि निर्धारित फॅक्ट्स छापलं जाईल. प्रत्येक खताच्या गोणीवर प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक परियोजना (PMBJP) लोगो छापला जाईल. अशा परिस्थितीत जर कोणी त्याचा काळाबाजार केल्यास त्याला पकडणे सोपे जाईल.

19 सप्टेंबरपर्यंत जुनी गोणी खरेदी करू नका :-

सरकारने सर्व कंपन्यांना 19 सप्टेंबर 2022 नंतर जुन्या डिझाईन आणि लोगो असलेल्या गोण्या खरेदी करू नयेत असे सांगितले आहे. आता खतांच्या पॅकिंगसाठी खरेदी केल्या जाणाऱ्या नवीन गोण्यांची रचना ‘एक राष्ट्र-एक खत’ अंतर्गत करण्यात यावी, असे स्पष्ट केलं आहे. हा ब्रँड 2 ऑक्टोबर 2022 रोजी बाजारात लॉन्च केला जाणार आहे. त्याचबरोबर जुन्या गोण्यांच्या वापरासाठी 21 डिसेंबर 2022 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.