नवरात्र संपताच कांद्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. मुबंईत कांदा 60 रुपये किलो तर दिल्लीत कांद्याचे भाव 70 रुपयांवर पोहोचले आहेत. इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, महाराष्ट्रातील लासलगाव एपीएमसीमध्ये गेल्या 15 दिवसांत कांद्याच्या घाऊक भावात 58 टक्क्यांनी वाढ झाली आहे, ज्याचे मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रातील एकूण पेरणी क्षेत्रात झालेली घट..
गेल्या आठवड्यातच कांद्याचे भाव 18 टक्क्यांनी वाढले आहेत. मंगळवारपर्यंत लासलगाव बाजारात कांद्याचा सरासरी भाव 38 रुपये किलो होता, जो दोन आठवड्यांपूर्वी 24 रुपये किलोच्या तुलनेत 58 टक्क्यांनी अधिक वाढला आहे. यापूर्वी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. महागाईमुळे सरकारला अडचणींचा सामना करावा लागला होता. आता कांदाही तुम्हाला रडवण्याच्या तयारीत आहे..
दिल्लीत कांदा 70 रुपयांवर पोहोचला..
देशाची राजधानी दिल्लीत कांद्याच्या किरकोळ दरात 25 ते 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या कांदा 50 ते 70 रुपये किलोने विकला जात आहे. बुधवारी दिल्लीसह महाराष्ट्रातील काही बाजारपेठांमध्ये चांगल्या प्रतीच्या कांद्याचा सर्वाधिक भाव 50 रुपये किलोपर्यंत पोहोचला. अहमदनगरमध्ये 10 दिवसांत कांद्याचे सरासरी दर 35 रुपये किलोवरून 45 रुपये किलोपर्यंत वाढले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील बहुतांश कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये घाऊक कांद्याचे दर आता 45 ते 50 रुपये प्रतिकिलो आहेत..
आणखी भाव वाढण्याची अपेक्षा..
रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की, डिसेंबरपर्यंत कांद्याचे दर वाढण्याची अपेक्षा आहे आणि नवीन खरीप पीक येण्यासही विलंब होत आहे, जे सुमारे दोन महिने विलंबाने येण्याची अपेक्षा आहे. बाजारातील कांद्याची घटती आवक हे कांद्याचे भाव वाढण्याचे प्रमुख कारण आहे. गेल्या पंधरवड्यात, साठवलेल्या कांद्याची आवक सुमारे 40 टक्क्यांनी घटली आहे, दररोज सुमारे 400 वाहने (प्रत्येकी 10 टन) वरून सुमारे 250 वाहने आली आहेत, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे..
नवीन कांद्याला दोन महिने विलंब..
अहमदनगर जिल्ह्यातील कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार शिर्के यांनी सांगितले की, खरीप हंगामातील नवीन लाल कांद्याची आवक सुमारे दोन महिने उशीर झाल्याने ही परिस्थिती कायम राहण्याची अपेक्षा असून येत्या महिनाभरात भाव शंभरीजवळ जाण्याची शक्यता आहे. 25 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावले होते. याशिवाय, वाढत्या किमती रोखण्यासाठी सरकारने नाफेडने खरेदी केलेला कांदा घाऊक बाजारात प्रचलित बाजारभावापेक्षा कमी दराने विकण्यास सुरुवात केली..
कांद्याचे भाव कुठे किती वाढलेत..
मुंबईत कांद्याचा भाव किलोमागे 45 ते 55 रुपयांदरम्यान आहे. वर्धा शहरात हाच भाव 60 रुपये आहे. कोल्हापूर शहरात कांदा प्रतिकिलो 40 रुपयांपर्यंत विकला जात आहे. एका वेळी तीन किलो घेतल्यास किलोमागे 35 रुपये मोजावे लागत आहेत. तर, पुण्यात कांदा प्रति किलो 45 रुपयांना विकला जात आहे. .