पंजाबरावांचा अंदाज खरा ठरतोय! राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात, पहा 6 ते 10 जानेवारीदरम्यान ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस..
डिसेंबर महिन्यात भारतातील बहुतांश राज्यांमध्ये फारशी थंडी किंवा पाऊस नव्हता, तर नवीन वर्षात जानेवारी महिन्याची सुरुवात दाट धुके आणि कडाक्याच्या थंडीने झाली आहे. याशिवाय अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने (IMD) जानेवारी महिन्यासाठी पाऊस, थंडी आणि थंडीची लाट यांचा अंदाज जाहीर केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार जानेवारी महिन्यात चांगल्या थंडीबरोबरच सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दक्षिण अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली. सध्या मध्य भारतावर दोन विविध दिशेने येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव होत आहे.
या प्रभावातून मध्य भारतावर पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. अरबी समुद्रात व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राजस्थान, केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्राच्या काही भागांत अवकाळी पाऊस पडू शकतो, असा अंदाज आहे. आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.
सांगली, अहमदनगर, बुलढाणा जिल्ह्यातील भागात पाऊस पडला आहे. यंदा राज्यात अपेक्षित थंडीला सुरुवात झाली नाही. ढगाळ हवामानामुळे थंडीचा पारा कमी जास्त होत आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील तीन चार दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण कोकण भागात हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पंजाबरावांचा अंदाज खरा ठरला..
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी 3 ते 9 जानेवारी दरम्यान महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला होता, त्यानुसार काल रात्री सांगली, अहमदनगर, बुलढाणा जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडला असून त्यांनी काल रात्री पुन्हा एक नवा अंदाज दिला आहे.
त्यांच्या मते, 6 ते 10 जानेवारी दरम्यान अवकाळी पाऊस पडणार असून तो संपूर्ण महाराष्ट्रभर पडणार नसून एवढा नुकसानदायक नसणार आहे.
हा पाऊस नागपूर, वर्धा, अकोला, वाशिम, यवतमाळ, हिंगोली, बुलढाणा, परभणी, नांदेड, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, धाराशिव, पुणे, दक्षिण कोकण भागात अवकाळी पडणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.