पेगॅसिस फोन टॅपिंग प्रकरण : मोदी सरकारवर बेडरूम मधल्या गुजगोष्टी ऐकल्याचा धक्कादायक आरोप, भारतासह जगभरात खळबळ !
महाअपडेट टीम, 19 जुलै 2021 :- पिगाससद्वारे फोन टॅपिंग प्रकरणी काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी सरकार राज्यघटना आणि कायद्याची हत्या करत असून मोदी सरकारने देशद्रोह केला आहे. देशाच्या सुरक्षेशी खेळ केला आहे. मोदी सरकार बेडरूममधल्या गुजगोष्टीही ऐकत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.
राहुल गांधींसह अनेक नेते आणि पत्रकारांची हेरगिरी करण्यात आली. भाजपचे नाव आता ‘भारतीय जाजूस पार्टी’ असे ठेवले गेले पाहिजे. एवढचं नव्हे तर सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुख अधिकाऱ्यांचीही हेरगिरी केली गेली, असं रिपोर्ट्समधून सांगण्यात येत असल्याचं सुरजेवाला म्हणाले. या प्रकरणी स्वतंत्र चौकशी केली गेली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
गृहमंत्री अमित शहांनी राजीनामा दिला पाहिजे. या प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या भूमिकेचीही चौकशी केली पाहिजे. हा मुद्दा आम्ही संसेदत उपस्थित करणार, असं काँग्रेसने मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.
पंतप्रधान मोदी डिजिटल इंडियाच्या गप्पा मारतात. हा सर्वेलन्स इंडिया आहे. सर्व विरोधी पक्ष या प्रकरणी एकजूट होऊन संसेदत आवाज उठवतील, असं काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले.
काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही ट्वीट करून केंद्र सरकारवर निशाना साधला आहे. पिगाससद्वारे हेरगिरी करण्यात येत आहे. हा प्रकार अतिशय घृणास्पद आहे. हे प्रकरण गंभीर असेल तर राज्यघटनेने जनतेला दिलेल्या खासगी अधिकारांवर गदा आणणारा आणि धोकादायक हल्ला आहे. यामुळे लोकशाही संपेल, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.