Take a fresh look at your lifestyle.

अहमदनगर : तब्बल 52 वर्षानंतर श्रीगोंदा तालुक्यातील ‘ही’ बहुचर्चित मोठी ग्रामपंचायत बिनविरोध । पहा सदस्यांची नावे…

शेतीशिवार टीम : 23 जुलै 2022 :- तालुक्यातील बहुचर्चित आणि राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या पिंपळगाव पिसा ग्रामपंचायतीची निवडणुक माजी आ.राहुल जगताप व दिनकर पंधरकर यांनी सहमती एक्स्प्रेस राबवत बिनविरोध केल्याने तब्बल 52 वर्षांनंतर पिंपळगाव पिसा ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने दोन्ही गटाच्या टोकाच्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे.

तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या पिंपळगाव पिसा ग्रामपंचायतीची 6 प्रभागातील 17 जागांसाठी 4 ऑगस्ट रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी 19 जुलै पर्यंत तब्बल 111 जणांनी आपले निवडणुक अर्ज दाखल केले होते.

शुक्रवार दि. 22 जुलै रोजी होणाऱ्या माघारीच्या प्रक्रियेत माजी आ. जगताप व दिनकर पंधरकर यांनी सहमती एक्स्प्रेस राबवत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेऊन पैकी 10 जागा पंदरकर गटाला देऊन सरपंच पद देण्याचे ठरले.

तर 7 जागा माजी आ. जगताप यांच्या गटाला घेतल्या. पिंपळगाव पिसा ग्रामपंचायत बिनविरोध करताना भास्करराव कदम व विश्वनाथ खरात यांनी मध्यस्थी करत महत्वपूर्ण जबाबदारी बजावण्याचे काम केले तर नागवडे कारखान्याचे संचालक डॉ. बंडू पंदरकर यांनी मोलाची कामगिरी बजावली.

बिनविरोध नवनिर्वाचीत सदस्याचे माजी आ. जगताप व मा. जिल्हा परिषद सदस्य दिनकरराव पंदकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार :-

1) इथापे लक्ष्मण बापु.
2) पंदरकर वंदना संतोष.
3) कदम बापु नरसिंग.
4) शिंदे चांदन नितीन.
5) पंदरकर सिमा संतोष.
6) पवार दत्तात्रय शंकर.
7) जगताप प्रियंका मयुर.
8) पाडळे अनिल रामकिसन.
9) जगताप प्रतापराव नारायण.
10) नागवडे अमृता सचिन.
11) भोसले सरोजनी संतोष.
12) पंदरकर सुपाली सुभाष.
13) पवार सुर्यजीत निवृत्ती.
14) पंदरकर किशोर आण्णासाहेब.
15) शेंडगे राहुल बापुराव.
16) सकट अजंना रमेश.
17) खरात अलका विजय.

गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध कराव्यात जेणेकरुन शासनाचा खर्च वाचेल. निवडणूक काळात एकमकेकांविरोधात निर्माण होणारी कटुता थांबेल. आणि गाव विकासाच्या मार्गावर जाईल या प्रयत्नातून आपण ही संकल्पना राबवत असल्याचे माजी आ. राहुल जगताप यांनी सांगितले.

पाठीमागच्या काळामध्ये ग्रामपंचायत बिनविरोध करा व लाखोचे बक्षीस कमवा अशी आश्वासने नेतेमंडळीनी दिली होती. मात्र प्रत्यक्ष स्वतःच्या गावची ग्रामपंचायत बिनविरोध करुन माजी आ. राहुल जगताप यांनी आपल्या राजकीय धुरंधरपणाची चुणूक दाखवली.