Take a fresh look at your lifestyle.

Pune Metro चा विस्तार पिंपरी ते भक्ती – शक्तीपर्यंत (निगडी) होणार, 4.13 Km अंतरासाठी 910 कोंटीचा खर्च, असा आहे रूट मॅप..

0

पिंपरी ते निगडीतील भक्ती – शक्ती चौकापर्यंत विस्तारित मेट्रोचा राज्य सरकारचा प्रस्ताव आपल्याकडे आलेला आहे. त्या प्रस्तावाला येत्या सात दिवसात मान्यता देण्याचे आश्वासन केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून लालफितीत अडकलेला हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर मेट्रो विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा होणार आहे.

पुणे मेट्रो प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टण्यात पिंपरी ते स्वारगेट हा मार्ग सुरू आहे. त्यापैकी पिंपरी – चिंचवड महापालिका ते फुगेवाडी आणि आता पिंपरी – चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय असा 13.9 किलोमीटरचा मेट्रो मार्ग सुरू झाला. या मार्गारून मेट्रोतून नागरिकांना प्रवास करता येत आहे.

मात्र , पिंपरी ते स्वारगेटबरोबर पिंपरी ते निगडी असे मेट्रोचे विस्तारीकरण व्हावे, अशी मागणी शहरवासीयांची होती. मात्र, मेट्रो, महापालिका, राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या नियोजनात हे विस्तारीकरण रखडले. मागील दोन वर्षांपासून हा प्रस्ताव लालफितीत अडकलेला आहे. दरम्यान, राज्य शासनाने निगडीपर्यंतच्या मेट्रोचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे.

तो प्रस्ताव मंजूर करण्यासाठी खासदार बारणे यांनी गुरुवारी (दि.3) संसद भवनात मंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट घेतली. तसेच, त्यांच्याकडे निगडीपर्यंतच्या मेट्रोला मान्यता देण्याची विनंती केली. त्यावर येत्या सात दिवसात मान्यता देण्याचे आश्वासन मंत्री पुरी यांनी दिल्याचे बारणे यांनी म्हटले आहे.

3 स्थानके, चार किमी अंतर आणि 910 कोंटीचा खर्च..

पिंपरी ते निगडी या विस्तारित मार्गावर चिंचवड, आकुर्डी आणि निगडी अशी तीन स्थानके असतील. या विस्तारित मार्गासाठी होणाऱ्या खर्चात केंद्र सरकार आणि पिंपरी – चिंचवड महापालिकेचा समप्रमाणात वाटा असेल. हा प्रस्तावित कॉरिडॉर 4.13 किमी लांबीचा असून तो एलिव्हेटेड कॉरिडॉर म्हणून बांधला जाईल. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अंदाजे खर्च 910.18 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

वाहतूक पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि पिंपरी – चिंचवडमधील रहिवाशांना चांगली कनेक्टिव्हिटी देण्यासाठी हा मेट्रो प्रकल्प आवश्यक असल्याचे मत मांडले जात आहे. पिंपरी – चिंचवडमध्ये गेल्या दोन दशकांत झपाट्याने नागरिकरण आणि लक्षणीय लोकसंख्या आणि रोजगार वाढ झाली आहे.

शहराची लोकसंख्या 2011 मध्ये 17.27 लाखांवरून 2021 मध्ये अंदाजे 21 लाखांपर्यंत वाढली. तर 2038 पर्यंत 39.9 लाखांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. आकुर्डी, चिंचवड आणि निगडी परिसरातील नागरिकांची निगडीपर्यंत मेट्रो सुरु करण्याची मागणी आहे.

याबाबत 25 फेब्रुवारी 2022 रोजी गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाला 910.18 कोटी रुपयांच्या प्रस्तावित खर्चासह सुधारित डीपीआर सादर करण्यात आला आहे. तो मंजूर झाल्यानंतर निगडीपर्यंत मेट्रोचा विस्तार होणार आहे. अशी माहिती मावळ लोकसभाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.