पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका या मार्गिकेचा नैसर्गिक विस्तार पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी या मार्गावर होणे आवश्यक होते. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी या विस्तारित मार्गासाठी पुणे मेट्रोकडून सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) बनवण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या मान्यतेनंतर राज्य व केंद्र शासनाकडे तो पाठवण्यात आला. महामेट्रोतर्फे त्याचा पाठपुरावा करून सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याचा सतत पाठपुरावा चालू ठेवला होता. त्यामुळे सोमवारी (दि. 23) भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी आवास मंत्रालयाकडून अंतिम मान्यता देण्यात आली.
या मार्गाची एकूण लांबी 4.414 किलोमीटर इतकी आहे. हा मार्ग संपूर्णतः उन्नत असणार आहे. या मार्गावर चिंचवड स्टेशन येथील पिंपरी पोलीस ठाणे, आकुर्डीतील खंडोबा माळ चौक आणि निगडीतील भक्ती – शक्ती समूह शिल्प चौक असे तीन स्टेशन असणार आहेत.
या मार्गासाठी एकूण खर्च 910.18 कोटी इतका असून या मार्गाचे काम तीन वर्षे तीन महिन्यांमध्ये पूर्ण होणार आहे. महामेट्रोने हे काम जलद करण्यासाठी जनरल कन्सल्टन्सी नेमण्यासाठी तसेच या प्रकल्पाचा सोशल इम्पॅक्ट असेसमेंट बनविण्यासाठी निविदा आधीच काढल्या आहेत. लवकरच यांनी मार्गिकेच्या सिव्हिल, विद्युत आणि सिग्नल या कामासाठीच्या निविदा काढण्यात येऊन ठेकेदारांच्या नेमणुका करण्यात येतील व प्रत्यक्षात तीन ते चार महिन्यांत कामाला सुरुवात होईल.
याप्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी हा विस्तारित मार्ग होणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे चिंचवड, आकुर्डी आणि निगडी हे भाग मेट्रो नेटवर्कला जोडले जातील आणि या परिसरात राहणाऱ्या लाखो लोकांना याचा फायदा होईल, महामेट्रो हे काम नियोजित वेळेत तीन वर्षे तीन महिन्यांत पूर्ण करेल. हा मार्ग पूर्ण झाला आणि पिंपरी चिंचवड ते निगडी मार्गही झाला तर निगडीवरुन थेट स्वारगेट मेट्रोने प्रवास करता येणार आहे.
वैशिष्ट्ये :-
पुणे मेट्रो अप्रोव्हल लाईन..
लाईन -1 (जांभळी रेषा) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) – निगडी
लांबी : 4.41 किमी
प्रकार : उन्नत
स्टेशनची संख्या : 3
स्टेशनची नावे : चिंचवड, आकुर्डी, निगडी