पुणे मेट्रोच्या वनाझ ते रामवाडी या मार्गिकेमध्ये वनाझ स्थानक ते रुबी हॉल क्लिनिकपर्यंतच्या सेवेची सर्व प्रकारची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मंगळवार (दि.1 ऑगस्ट) पासून ही सेवा पुणेकरांसाठी उपलब्ध असणार आहे. तसेच, सिव्हिल कोर्ट याठिकाणीही पीएमपी फिडर सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

गरवारे कॉलेज स्थानक ही मार्गिका प्रवाशांसाठी मागील वर्षी खुली करण्यात आली. गरवारे कॉलेज स्थानक ते रामवाडी स्थानक मार्गिकेवरील कामे अत्यंत वेगाने सुरू होती. एप्रिल 2023 अखेर गरवारे कॉलेज स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या मार्गिकेचे काम पूर्ण करून सी.एम. आर. एस. इन्स्पेक्शन करण्यात येणार होते. मात्र, आता 1 ऑगस्ट रोजी ही मार्गिका प्रवासी वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. सिव्हिल कोर्ट या महत्त्वाच्या स्थानकाची तयारीही पूर्ण झाली आहे. त्याठिकाणी तिकीट देण्याची व्यवस्था असणार आहे, अशी माहिती पुणे मेट्रोचे संचालक तथा जनसंपर्क अधिकारी हेमत सोनवणे यांनी दिली.

या मार्गिकेवर डेक्कन, छत्रपती संभाजी उद्यान, पुणे महानगरपालिका, सिव्हिल कोर्ट, मंगळवार पेठ, पुणे रेल्वे स्थानक आणि रुबी हॉल क्लिनिक ही महत्त्वाची स्थानके आहेत. ही मार्गिका खुली करण्यात आल्यानंतर नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता (एफसी रस्ता), जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व, पुणे मनपा, दिवाणी न्यायालय, आरटीओ, पुणे रेल्वे स्थानक, रुबी आणि जहांगीर हॉस्पिटल, वाडिया कॉलेज इत्यादी महत्त्वाची ठिकाणे मेट्रोद्वारे जोडली जाणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना फायदा होणार आहे.

या मेट्रो स्थानकांपैकी डेक्कन आणि छत्रपती संभाजी उद्यान स्थानक यांचे काम अत्यंत आव्हानात्मक होते आणि त्या आव्हानांवर मात करत ती स्थानके पूर्णत्वाकडे आली आहेत. डेक्कन आणि छत्रपती संभाजी उद्यान या स्थानकांची वैशिष्ट्यपूर्ण रचना असल्यामुळे ही स्थानके पुण्याची शान असणार आहेत. या स्थानकांची रचना छत्रपती शिवाजी महाराज याच्या मावळ्याच्या पगडीच्या आकाराप्रमाणे करण्यात आली आहे.

प्रत्येक रूफ शीटचा आकार आणि लांबी वेगळी असल्याने त्याला बाक देण्यासाठी स्थानकाच्या जागेजवळ प्रोग्रेसिव रोलिंग मिल बसवण्यात आले आहे. डेक्कन आणि छत्रपती संभाजी उद्यान ही स्थानके नदीपात्रात असून स्थानकांची उंची जमिनीपासून 60 ते 70 फूट आहे या दोन्ही स्थानकांचे छताची पगड़ी’ आणि ‘नॉन पगड़ी’ असे काम करण्यासाठी विभागणी करण्यात आले होती. दोन्ही विभागाचे काम त्यांच्या त्रिमितीय रचनमुळे आव्हानात्मक होते. दोन्हीही भागांसाठी वैशिष्ट्यपूर्ण रंगसंगतीची रचना करण्यात आली आहे . त्यामुळे ही स्थानके अत्यंत विलोभनीय दिसणार आहेत.

डेक्कन आणि छत्रपती संभाजी उद्यान स्थानक यांच्या विशिष्ट रचनेमुळे कामे आव्हानात्मक होती. त्याचप्रमाणे ही स्थानके नदीपात्रात असल्याने तेथे सामान घेऊन जाण्यासाठी खूप अवघड होते. नदीपात्रात थेट असा रस्ता नसल्याने अवजड वाहने, क्रेन, काँक्रीट नाइट सिमट ब्लॉक छतासाठी लागणारे मोठे लोखंडी खांब, रूफ शीट इत्यादी सामान ने – आण करण्यासाठी अडचणीचे होते.

तेथे एका बाजूला नदीपात्र तर दुसऱ्या बाजूला झेड ब्रीज व छत्रपती संभाजी उद्यान यामुळे रूफ शीटचे क्रेनद्वारे काम करणे खूपच अडचणीचे ठरत होते. परंतु, या सर्व आव्हानांवर मात करत या दोन्ही स्थानकांची कामे पूर्ण झाली आहेत. डेक्कन आणि छत्रपती संभाजी स्थानक ही स्थानके लवकरच प्रवाशांसाठी खुली झाली आहेत.

यामुळे जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व रंगमंदिर, मॉडर्न कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, डेक्कन जिमखाना, नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता इत्यादी अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणांना मेट्रोद्वारे जाणे सहज शक्य होणार आहे. या स्थानकांवर जाण्यासाठी पादचारी पुलाद्वारे जंगली महाराज रस्ता व फर्ग्युसन कॉलेज रस्ता येथून जाणे शक्य होणार आहे.

या दोन्ही स्थानकांना पेठ भागाशी जोडण्यासाठी पादचारी केबल सस्पेंडेड पुलाचे कामदेखील प्रगतिपथावर आहे. त्यामुळे नारायण पेठ ते डेक्कन स्थानक व छत्रपती संभाजी स्थानक ते शनिवार पेठ ही दोन्ही ठिकाणे पादचारी पुलाद्वारे जोडली जाणार आहेत. यामुळे शनिवार पेठ, नारायण पेठ आणि त्या लगतच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मेट्रोद्वारे शहराच्या विविध भागात जाणे शक्य होणार आहे.

पहा पुणे मेट्रो चे टाइम टेबल..

मेट्रोचे गरवारे महाविद्यालय ते रुबी रुग्णालय आणि फुगेवडी ते दिवाणी न्यायालय हे मार्ग 1 ऑगस्ट रोजी सुरू करण्यात येणार आहेत. या मार्गावर सकाळी 7 ते 11 या वेळेत दर 10 मिनिटाला तर 11 ते 2 या वेळात दर 15 मिनिटाला मेट्रो धावेल. अशी माहिती संचालक विनोदकुमार अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत सातही दिवस मेट्रो धावणार असून प्रत्येक स्थानकावर मेट्रो 30 सेकंद थांबणार आहे.सर्व मेट्रो स्थानकांवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

किती असणार तिकीट :-

वनाज ते रूबी हॉल मार्गांसाठी 25 रुपये तर, पिंपरी चिंचवड- शिवाजीनगर न्यायालय दरम्यानसाठी 30 रुपये तिकिट असेल. मेट्रोसाठी किमान तिकिट 10 रुपये तिकिट असणार आहे.

तसेच सध्या पिंपरी चिंचवड ते फुगेवाडी मार्गावर सध्या मेट्रो वाहतूक सुरू आहे. आता तिचा विस्तार फुगेवाडी ते शिवाजीनगर न्यायालय दरम्यान होणार असून त्या प्रवासासाठी 25 रुपये तिकिट असणार आहे. तर विद्यार्थ्यांना तिकिटदरात 30 टक्के सवलत देणार असल्याची घोषणा ‘महामेट्रो’ने गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

विस्तारीत मार्गांवर मेट्रो वनाज – ते रुबी हॉल दरम्यानचे अंतर 20- 25 मिनिटांत पार करेल. तर, पिंपरी चिंचवड ते शिवाजीनगर न्यायालय दरम्यानचे अंतर 25-30 मिनिटांत पूर्ण होईल..

शहराच्या सौंदर्यात पडणार भर .. .

डेक्कन स्थानक आणि छत्रपती संभाजी स्थानक या दोन्ही स्थानकांदरम्यान मेट्रो व्हायडक्ट खाली एक पादचारी पूल बनविण्यात येणार आहे. त्यामुळे ही दोन्ही स्थानके पादचारी पुलामुळे जोडले जातील. या विहंगम परिसराच्या शोभेमध्ये अधिकच भर पडणार आहे. डेक्कन आणि छत्रपती संभाजी उद्यान स्थानक यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे ही दोन्ही स्थानके अत्यंत देखणी अशा स्वरूपाची होत आहेत. या दोन्ही स्थानकांची रचना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळा पगडीपासून प्रेरणा घेऊन बनवली आहेत. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *