शेतीशिवार टीम, 4 डिसेंबर 2021 : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी शिरूर-हवेली मतदार संघाचे विद्यमान आमदार अशोक रावसाहेब पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. यावेळी त्यांचा थेट सामना सलग तीन वेळा हॅट्ट्रीक साधलेल्या निवृतीअण्णा गावारेंशी होणार असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या मंडळावर आत्तापर्यंत पुणे जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यातील आमदारांनी जिल्हा बॅंकेचे संचालकपद भूषवलं आहे. आता यांच्या रांगेत बसण्याची संधी आ. अशोक पवार यांना मिळाली आहे.
तसं पाहिलं तर या निवडणुकीसाठी आ. अशोक पवार यांनी सगळीकडून पोषक वातावरण निर्माण झालं आहे. याची मार्चेबांधणीही पवार यांनी फार अगोदरपासूनच केलेली आहे. आमदारांचे कट्टर विरोधक असलेले माजी आमदार बाबुराव पाचर्णे राजकारणात म्हणावे इतके सक्रिय नसल्याचे दिसून येत आहे.
तसेच जिल्हा बॅंकेच्या राजकारणात कायम लक्ष घालणारे माजी सभापती मंगलदास बांदल सध्या कारागृहात असल्याने आ. अशोक पवार यांच्या विरोधात कोणी जाण्याची शक्यता कमीच आहे.
एकूण सोसायटी मतदार संघातील (अ वर्ग) 131 मतांपैकी शिरूर-आंबेगावमधील 50 अन् पक्षाअंतर्गत राजकारणामुळे शिरूरमध्ये चमत्कारीक निकालाचीही चर्चाही अधूनमधून रंगताना दिसून येते.
परंतु राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष मर्जी असल्याने गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून शिरूरमध्ये हस्तक्षेप होईल, अशी शक्यताही धूसर आहे. त्यामुळे सध्या तरी आ. अशोक पवार यांचं पारडे जड मानले जातं असून जिल्हा बँकेवर निवडून जाण्याची शक्यता अधिक असल्याचं जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.
पुणे जिल्हा बँकेचा आजवरचा इतिहास म्हणजे बहुतांश तालुक्यातील आमदार हे बँकेचे संचालक आहेत. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार( बारामती), गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध विकास मंत्री दत्तात्रेय भरणे (इंदापूर ), आ. संजय जगताप (पुरंदर), आ.दिलीप मोहिते-पाटील ( खेड -आळंदी ) जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष रमेशअप्पा थोरात यांचा समावेश असून या सर्वानी पुन्हा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
आता आ. अशोक पवारांचही आमदार – जिल्हा बॅंकेचे संचालक या रांगेत बसण्याचं स्वप्न पूर्ण होतंय का ? हे पाहून उत्सुकतेचं ठरणार आहे.