Take a fresh look at your lifestyle.

Virat Kohli : वन-डे, टी-20, अन् आता कसोटी संघाचं कर्णधारपदही सोडलं ; सोशल मीडियावर भावुक पोस्ट…

शेतीशिवार टीम, 15 जानेवारी 2022 : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतर विराट कोहलीने आज (शनिवारी) कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीने ट्विटरवर एक भावनिक पोस्ट लिहून ही माहिती दिली आहे. 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांची मालिका शुक्रवारीच संपली. भारताने मालिका 2-1 ने गमावली. दोन सामन्यात विराट कोहली तर एका सामन्यात केएल राहुलने कर्णधारपद भूषवलं होतं. त्याने यापूर्वीच टी-20 आणि वनडे संघाचे कर्णधारपद सोडले आहे.

T20 विश्वचषक 2021 पूर्वी, त्याने T20 कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. परंतु निवडकर्त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी वन डे कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड केली होती.

अशा परिस्थितीत विराटकडे केवळ कसोटी संघाचे कर्णधारपद होतं परंतु त्याने आता कर्णधारपदाची जबाबदारी पूर्णपणे काढून टाकली आहे. IPLमध्येही तो यापुढे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबीचा (RCB) कर्णधार म्हणून दिसणार नाही.

विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडताना एक भावुक पोस्ट लिहिली आहे. आपल्या संदेशात त्यांनी लिहिले की, गेली सात वर्षे सातत्याने मेहनत घेत असून संघाला योग्य दिशेने नेण्याचा दररोज प्रयत्न सुरू आहे.

मी माझे काम प्रामाणिकपणे केलं आणि कोणतीही कसर सोडली नाही. हे सर्व काही कधीतरी थांबलं पाहिजे आणि भारताच्या कसोटी कर्णधारपदावरून पायउतार होण्याची हीच माझ्यासाठी योग्य वेळ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

विराट कोहलीने आतापर्यंत 68 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केलं आहे. यादरम्यान भारतीय संघाने 40 सामने जिंकले आहेत, तर 17 सामने गमावले आहेत. विराट कोहली 2014 पासून भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करत आहे.