Surat-Chennai Expressway : शेतकऱ्यांचा भूसंपादन कार्यालयात धुडगूस ; बाजार भावापेक्षा कमी पैसे, जिरायतीसाठी प्रतिहेक्टरी 5 लाख तर बागायतीसाठी..
सुरत – चेन्नई महामार्गाच्या रिंगरोडसाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील 13 गावांमधील जमिनीचे भूसंपादन करण्यात येत आहे, त्यासाठीच्या नोटिसा शेतकऱ्यांना बजाविण्यात आल्या आहेत. जमिनीला बाजार भावापेक्षा कमी दर मिळत असल्याची तक्रार करीत दर्गनहळ्ळी गावातील शेतकऱ्यांनी भूसंपादन क्रमांक 11 च्या कार्यालयात धुडगूस घातला.
योग्य दर न मिळाल्यास वेळप्रसंगी आत्मदहन करू, पण जमिनी देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यावर शेतकऱ्यांची समजूत न काढता उपजिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी अरेरावीची भाषा केली संतापलेल्या शेतकऱ्यांनी जमिनी देणारच नसल्याचे सांगत भूसंपादन कार्यालयातून काढता पाय घेतला. (Surat-Chennai Expressway)
शुक्रवारी, दर्गनहळ्ळी गावातील शेतकरी भूसंपादन कार्यालयात बजावण्यात आलेल्या नोटिसा स्वीकारण्यासाठी आले होते. नोटिसा हातात पडल्यानंतर जमिनीला कवडीमोल दर मिळत असल्याचे सांगत योग्य भाव न मिळाल्यास जमीन देणार नसल्याचे सांगत धुडगूस घालण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला.
उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांच्या दालनात आमच्या जमिनीला कवडीमोल दर मिळत आहे, शेतातील झाडे, घरे, विहिरी आणि बोअरचे मूल्यांकनही योग्य पद्धतीने झालेले नाही, रस्त्यासाठी जमीन हवी असेल तर योग्य मोबदला देण्यात यावा. अन्यथा आमच्या जमिनीचे संपादन करू नये.
तुम्ही शासनाचे प्रतिनिधी आहात, आमची बाजू तुम्ही शासनाकडे मांडा. आमच्या जमिनीला वाढीव मोबदला मिळवून द्या, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. त्यावर तुमचे आमदार व खासदार हेच तुमचे लोकप्रतिनिधी आहेत. तुम्ही त्यांच्याकडे वाढीव मोबदल्यासाठी हट्ट घरा, अशा शब्दात उपजिल्हाधिकाऱ्यांनी शतकऱ्याशी संवाद साधला.
शेतकऱ्यांचा अर्ज संबंधित विभागाला देऊ..
शेतकऱ्यांच्या जमिनीचे मूल्यांकन झाले आहे. रेडीरेकनरचा विचार करून सर्वोच्च दरानुसार जमिनींना चारपट मोबदला देण्यात येणार आहे. दर्गनहळ्ळी गावच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या जिरायत जमिनीसाठी प्रतिहेक्टरी 5 लाख 16 हजार 89 रुपयांचा तर बागायत क्षेत्रासाठी 7 लाख 89 हजार रुपयांचा दर निश्चित झाला आहे. शेतकऱ्यांना तो मान्य नसेल तर त्यांचा तक्रारी अर्ज संबंधित विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात येईल. अशी माहिती सोलापूर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी दिली आहे.
311 हेक्टर जमिनीची आवश्यकता..
सुरत चेन्नई महामार्ग जिल्ह्यातील तीन तालुक्यातील 37 गावांच्या हद्दीतून जात आहे. या महामार्गाला जोडण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातून हत्तूर ते तांदूळवाडी दरम्यान बाह्यवळण रस्ता प्रस्तावित आहे. त्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील 13 गावातील 240.18 हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येत आहे.
तर उत्तर सोलापूर तालुक्यातील सात गावांमधील 71 हेक्टर अशी एकूण 20 गावांमधील 311 हेक्टर जमिनीची मोजणी पूर्ण करण्यात आली आहे. आता भूसंपादनाची पुढील कार्यवाही सुरू झाली असून, शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.