टेंभू उपसा योजनेला नवीन मान्यता ! 7,370 कोटींचा निधी मंजूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील ‘ही’ 94 गावे सुखावणार..

0

टेंभू उपसा सिंचन योजनेसाठी तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यतेंतर्गत 7370.03 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. या निधीमुळे सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त भागातील सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटण्यास मदत होणार आहे.

राज्य सरकारच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत कृष्णा नदीवरील टेंभू गावाजवळ बंधारा बांधून विविध टप्प्यांद्वारे 22 अब्ज घनफूट पाण्याचा उपसा करून सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सात दुष्काळग्रस्त तालुक्यांतील 80,472 हेक्टर क्षेत्राला पाणी देण्याची ही योजना होती.

पण, या प्रकल्पालगतच्या आणि भौगोलिकदृष्ट्या उंचावरील भाग पाण्यापासून वंचित होता. या क्षेत्राला पाणी देण्याच्या प्रस्तावाला सप्टेंबर 2023 मध्ये अंतिम मान्यता देण्यात आली होती. वापरास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार आठ अब्ज घनफूट पाणी हे अतिरिक्त पाणी टेंभू विस्तारित टप्पा क्र. सहा अ आणि ब पळशी उपसा सिंचन योजना, माण व खटाव उपसा सिंचन योजना, टप्पा क्रमांक पाच, बेवनूर वितरिका, कामत गुरुत्व नलिका या कामांचा नव्याने समावेश करून टेंभू योजनेचा विस्तार तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार होणार आहे.

या अतिरिक्त पाणी वापरामुळे सिंचनापासून वंचित असलेल्या एकूण 94 गावांसाठी पाणी उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. या विस्तारित योजनांसाठी एकूण 30 अब्ज घनफूट पाण्याचा वापर नियोजित आहे. या विस्तारित योजना कार्यान्वित झाल्यास एकूण 1,21,475 हेक्टर क्षेत्रास लाभ होणार आहे.

हे क्षेत्र सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील आहे. एकूण 7370.03 कोटी रुपयांमधील प्रत्यक्ष कामासाठी 6,780,48 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, तर आनुषंगिक खर्चासाठी 661.55 कोटी रुपयांचा वापर नियमानुसार करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.