आपल्या पाल्याला अगदी सुरुवातीपासून सर्वसुविधायुक्त दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी पालक हजारो रुपये फी भरुन त्यांना महागड्या खासगी शाळांमध्ये दाखल करतात. खासगी शाळेतील विद्यार्थीच झकपक गणवेश, शूज सॉक्स घालून जाताना दिसतात. परंतु आता जिल्हा परिषद शाळेत जाणारे विद्यार्थी देखील चांगल्या गणवेशासोबतच पायात सॉक्स आणि बूट घालून शाळेत जाताना दिसणार आहेत.
जि.प.शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना 2 गणवेशासह 1 शूज व 2 पायमोजे मोफत देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून त्यासाठी 158.52 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत मोफत गणवेश योजनेमधून शासकीय तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता 1 ली ते 8 वीच्या वर्गातील सर्व मुली, अनुसूचित जाती व जमातींची सर्व मुले आणि दारिद्य रेषेखालील पालकांच्या मुलांनाच मोफत गणवेशाचा लाभ देण्यात येतो.
सद्य:स्थितीत उपरोक्त शाळांमधील फक्त दारिद्रयरेषेवरील पालकांच्या मुलांना मोफत गणवेश योजनेचा लाभ मिळत नाही. त्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्याचा, तसेच मोफत गणवेश योजनेतर्गत सर्व पात्र विद्याथ्यांना शालेय गणवेशासोबतच एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे दिले जाणार आहेत.
या योजनेप्रमाणेच शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता 1 ली ते 8 वी तील सर्व विद्यार्थ्यांना दरवर्षी एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे शालेय व्यवस्थापन समितीमार्फत विद्यार्थ्यांना देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सर्व मुली, अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती मुले, दारिद्य रेषेखालील 1 लाख 44 हजार 137 पात्र विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी 12 गणवेशासाठी जिल्ह्याला 4 कोटी. 32 लक्ष 41 हजाराचा निधी प्राप्त झाला.
शूजसाठी विद्यार्थ्याला मिळणार 170 रुपये..
मोफत गणवेश योजनेपासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन गणवेश उपलब्ध करुन देण्याकरीता प्रति विद्यार्थी 600 रुपये प्रमाणे सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता 75.60 कोटी तर पात्र विद्यार्थ्यांना एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे उपलब्ध करुन देण्याकरीता प्रति विद्यार्थी 170 रुपये याप्रमाणे 82.92 कोटी इतका निधी समग्र शिक्षा अभियानातंर्गत सर्वसाधारण राज्य हिस्स्याच्या रक्कमेमधून खर्च करण्यास मान्यता देण्यात आली.