अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातील दुष्काळी भागासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. तब्बल 32 गावांसाठी जीवनदायी ठरणारी ‘साकळाई उपसा सिंचन योजना’ अखेर मंजूर झाली आहे.
राज्य मंत्रिमंडळाने 1 एप्रिल 2026 रोजी या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी तब्बल 1,234 कोटी 13 लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. या योजनेद्वारे पुणे जिल्ह्यातील घोड धरणाच्या येथून पाणी उचलून सुमारे 9,600 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणले जाणार आहे.
या योजनेअंतर्गत घोड धरणाच्या जलाशयातून मौजे म्हसेगाव येथे पंपगृह क्रमांक 1 उभारले जाणार आहे. त्यानंतर पंपगृह 1 ते 4 आणि वितरण कुंड 1, 2 व 3 यांच्या माध्यमातून एकूण चार टप्प्यांत जवळपास 208.34 मीटर उंचीपर्यंत पाणी उचलले जाणार आहे. हे पाणी पुढे चिखली आणि घुटेवाडी परिसरातील डोंगरावरील वितरण हौदांमध्ये सोडण्यात येईल.
यानंतर वितरण हौद क्रमांक 2 आणि 3 मधून गुरुत्वाकर्षणावर आधारित बंदिस्त पाइपलाइन प्रणालीद्वारे पाणी सोडले जाईल. या प्रक्रियेमुळे लाभक्षेत्रातील 32 गावांमधील सुमारे 196 तलावांमध्ये पाणी पोहोचवले जाणार आहे, ज्यामुळे सिंचन व पिण्याच्या पाण्याची सोय सुधारेल.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये :-
उद्देश : –
श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातील 32 गावांमधील 196 पाझर तलाव, लघुपाट बंधारे आणि गाव तलाव भरून सिंचन व पिण्याच्या पाण्याची सोय करणे.
पाण्याचा वापर : –
एकूण 1.80 टीएमसी पाणी वापरले जाणार.
कार्यपद्धती :-
पुणे जिल्ह्यातील घोड धरणाच्या जलाशयातून (म्हसेगाव) 4 टप्प्यांत पाणी उचलून, चिखली आणि घुटेवाडी येथील डोंगरावरील वितरण हौदांमार्गे पाणी पोहोचवले जाईल.
लाभार्थी क्षेत्र :-
सुमारे 9,600 हेक्टर शेती क्षेत्र ओलिताखाली येणार..
40 वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम..
गेल्या चार दशकांपासून प्रलंबित असलेल्या या योजनेसाठी स्थानिक कृती समिती आणि पालकमंत्री Radhakrishna Vikhe Patil यांनी मंत्रालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रकल्पामुळे नगर आणि श्रीगोंदा तालुक्याच्या पूर्व भागातील पाणीटंचाईचा दीर्घकालीन प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे. तसेच शेती, पिण्याचे पाणी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे.
Comments are closed.