शेतीशिवार टीम, 10 जानेवारी 2022 : संपूर्ण जग कोरोनाव्हायरसच्या नव्या Omicron व्हेरियंटला सामोरे जात असताना आता नव्या व्हेरियंटने दार ठोठावलं आहे. Omicron चा नवा व्हेरियंट आतापर्यंत सगळ्यात वेगाने पसरणारा व्हेरियंट म्हणून ओळखला गेला. परंतु आता सायप्रसमध्ये Delta आणि Omicron चा मिश्र व्हेरियंट Deltacron आढळून आला आहे. सायप्रसमधील 25 लोकांना या नव्या व्हायरसची लागण झाल्याचे समोर आलं आहे.
सायप्रस विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान आणि आण्विक विषाणूशास्त्राच्या प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. लिओनडिओस कोस्ट्रिकिस यांच्या मते, सायप्रसमध्ये घेतलेल्या 25 नमुन्यांपैकी 11 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तर 14 पूर्णपणे सामान्य होते.
शास्त्रज्ञ कोस्ट्रिकिस म्हणाले की, रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांमध्ये म्युटेशनची फ्रिक्वेन्सी जास्त होती, अन् त्यांना त्रास होण्यास सुरुवात झाली होती.
Omicron आतापर्यंत सर्वाधिक वेगाने पसरणारा व्हेरिएंट असल्याचं सांगितलं जात आहे. तर डेल्टा व्हेरिएंटने मागील वर्षी देशातील अनेक भागात अक्षरशः हाहाकार माजवला होता.
अशात आता या दोन्ही व्हेरिएंटच्या मिश्रणातून तयार झालेला व्हेरिएंट किती घातक असू शकतो, याचा अंदाज लावता येईल. सायप्रसच्या संशोधकांनी याच आठवड्यात आपले निष्कर्ष GISAID ला पाठवले. GISAID एक आंतरराष्ट्रीय डेटाबेस आहे, जे व्हायरसला ट्रॅक करतात.