विखे घराण्याच्या ५० वर्षाच्या राजकारणाच्या परंपरेप्रमाणे यंदाच्या लोकसभा निवडणूकीतही त्यांनी नीलेश साहेबराव लंके या डमी उमेदवाराला निवडणूकीच्या रिंगणात उतरवून रडीचा डाव खेळल्याचा आरोप शुक्रवारी महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आला.
राष्ट्रवादी भवन येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, काँग्रेसचे नगर तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, आपचे संघटक सुभाष केकाण हे उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या वतीने बोलताना राजेंंद्र फाळके यांनी सांगितले की, विखे हे डमीचा वापर अनेक ठिकाणी करतात. डॉ. सुजय विखे यांच्या डिग्रीबाबात त्यांच्या सख्ख्या चुलत्यानेच उल्लेख केला आहे. रक्ताच्या नात्यातील असल्याचे भासविण्यासाठी दुसरी व्यक्ती उभी करून संपत्तीची विल्हेवाट लावल्याचा आरोपही अशोक विखे यांनी केला असल्याचे फाळके यांनी सांगितले.
तलाठी भरतीमध्येही डमी उमेदवार पास !
महसूल विभागाच्या तलाठी भरतीमध्येही अनेक डमी उमेदवार पास झाले. अशाच प्रकारे डमी उमेदवार उभा करून डॉ. सुजय विखे यांनी आपल्या कुटूंबाची परंपरा पुढे चालविली आहे. निवडणूक लढविण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे नावातील साधर्म्य पाहून दिशाभुल करण्यासाठी डमी अर्ज दाखल करण्यात आल्याचा आरोप फाळके यांनी केला.
कोणती यंंत्रणा पळाली ?
फाळके म्हणाले, निघोजच्या जानेवारी महिन्यात प्रसिध्द झालेल्या मतदार यादीत भाग क्र. ३११ मध्ये अनुक्रमांक १०३५ वर सतीश बळवंत लंके यांचे नाव आहे. त्यानंतर प्रसिध्द झालेल्या सुधारीत मतदार यादीत भाग क्र. ३११ मध्ये अनुक्रमांक १०३५ वर नीलेश साहेबराव लंके यांचे नाव आहे. नीलेश साहेबराव लंके यांचे नाव निघोजच्या मतदार यादीत टाकण्यासाठी अशी कोणतील शासकीय यंत्रणा पळाली असा सवाल फाळके यांनी केला.
एकाच व्यक्तीने आणले दोघांचेही स्टॅम्प नोटरीचा वकीलही एकच
निवडणूक अर्जासोबत सादर करण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रासाठी डॉ. सुजय विखे यांच्यासाठी ज्या डी.पी. अकोलकर यांनी स्टॅम्प खरेदी केला, त्याच अकोलकर यांनी नीलेश साहेबराव लंके यांच्या प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प खरेदी केला आहे. तर एकाच वकीलाने दोघांचीही नोटरी केल्याचा दावाही फाळके यांनी कागदपत्रांसह केला.
विखे कुटूंब घाबरले !
निवडणूक प्रक्रियेदरम्यान बातम्या चालवून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न विखेंकडून होईल अशी शंका व्यक्त करतानाच गांधी मैदानावर झालेल्या सभेत शरद पवार यांनी नगरचा उमेदवार बदलण्यासाठी उद्योगपतीला पाठविल्या गंभीर आरोप केला होता. त्यामुळे विखेे कुटूंब महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश ज्ञानदेव लंके यांच्या उमेदवारीला घाबलेले दिसते असे फाळके म्हणाले.
डमी राजकारण जिल्हा खपवून घेणार नाही
लंके यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यताही फाळके यांनी व्यक्त करतानाच ते नीलेश ज्ञानदेव लंके यांच्या उमेदवारीला घाबरले असतील तर त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना, पक्षाला तसे कळवायला हवे होते. डमी राजकारण होणार असेल तर जिल्हा ते खपवून घेणार नाही असे फाळके म्हणाले.
आमच्याकडेही दोन सुजय विखे आले होते
फाळके म्हणाले, आमच्याकडेही सुजय रमाकांत विखे व सुजय दिगंबर विखे हे दोन जण आले होते. आमचेही डमी अर्ज दाखल करा असे त्यांचे म्हणणे होते. मात्र आम्ही स्वारस्य नसल्याचे सांगत नकार दिला.
आम्हाला कोणतीही भिती नाही
आम्हाला कोणतीही भिती नाही. मात्र डमी नावाने गैरवापर नको म्हणून ही बाब आम्ही माध्यमांपुढे मांडली. निवडणूक निवडणूकीच्या पध्दतीने लढवून आचारसंहितेचे काटेकोर पालन महाविकास आघाडीकडून केले जाईल असेही फाळके यांनी स्पष्ट केले.
भाजपाचे तालुकाध्यक्ष सुचक !
भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष राहुल प्रकाशराव शिंदे यांची नीलेश साहेबराव लंके यांच्या अर्जावर सुचक म्हणून स्वाक्षरी आहे. तर भाजपा कार्यकर्ते तथा सुप्याचे माजी उपसरपंच दत्तात्रय पवार, कडूसचे सरपंच मनोज मुंगसे, अस्लम इनामदार, आदीत्य ज्ञानेश्वर नरवडे, संतोष नामदेव वराळ, आकाश विजय वराळ, राहुल संजय पवार, ओंकार संतोष मावळे यांच्याही सुचक म्हणून स्वाक्षऱ्या आहेत.