विधान परिषदेत कोणत्या पक्षाचे किती आमदार, पहा, विरोधी पक्षनेतेपदी कोणाची लागणार वर्णी, परब की खडसे ?
शेतीशिवार टीम : 18 जुलै 2022 :- पक्ष वाचवण्यासाठी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची साथ सोडलेल्या शिवसेनेला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदासाठी पुन्हा महाविकास आघाडीचेच बोट धरावे लागणार आहे. अन्यथा हे पदही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाईल आणि त्या पक्षाचे नवनिर्वाचित सदस्य एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते होतील.
शिवसेनेतील बंडखोर गटाने विधानसभेत ‘आम्हीच मूळ शिवसेना’ म्हणत मुख्यमंत्रीपद मिळवले आहे. संख्याबळ कमी झालेल्या मूळ शिवसेनेकडे त्यामुळे केवळ 15 आमदार उरल्याने विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले.
त्या पक्षाने अजित पवार यांना ते पद दिले. शिवसेनेने आता विधान परिषदेच्या सभापतींना पत्र पाठवून त्या सभागृहातील विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे.
शिवसेनेशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसही या पदाच्या स्पर्धेत आहे. विधान परिषदेत शिवसेनेचे 12 सदस्य आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडे. प्रत्येकी 10 सदस्य आहेत.
शिवसेनेने आपण महाविकास आघाडी सोबतच आहोत, असे स्पष्ट केले तरी राष्ट्रपती निवडणुकीतील शिवसेनेच्या भूमिकेचे कारण पुढे करून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस परस्परांत युती करून विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा करू शकतात.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवतीय, माजी मंत्री अनिल परब विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते हाऊ शकतात. मात्र त्यासाठी त्यांना कॉग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठिंबा आवश्यक असेल.
दोन्ही काँग्रेसनी शिवसेनेच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील भूमिकेकडे काणाडोळा करून महाविकास आघाडी कायम ठेवली, तर परब विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होतील. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर खडसे यांच्याऐवजी शिवसेनेचे कोणीही अगदी परब ही यावेत अशीच फडणवीस आणि भाजप यांची इच्छा असणार .
महाराष्ट्रातल्या 78 सदस्यांच्या विधान परिषदेचं सध्याचं असलेलं पक्षीय बलाबल :-
भाजपा :- 24
शिवसेना :- 12
काँग्रेस :- 10
राष्ट्रवादी काँग्रेस :- 10
लोकभारती – 1
शेकाप – 1
राष्ट्रीय समाज पक्ष -1
अपक्ष – 4
रिक्त असलेल्या जागा :- 15 जागा
राज्यपाल नियुक्त 12 जागा
रिक्त :- 2 जागा
मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने 1 जागा रिक्त…