उत्तर बंगालच्या उपसागरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर आहे. येत्या २४ तासांत त्याचे रूपांतर अतिठळक कमी दाबाच्या क्षेत्रात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील तीन दिवसांत ओडिशा आणि छत्तीसगड राज्य ओलांडून ते पुढे सरकण्याची शक्यता आहे. परिणामी, महाराष्ट्रात गुरुवारी संध्याकाळपासून मान्सून सक्रिय होण्याची शक्यता पुणे वेधशाळेच्या शास्त्रज्ञ शिल्पा आपटे यांनी वर्तवला आहे.
तर, पुणे जिल्ह्यात हलका तसेच घाट परिसरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासांत त्याचे रूपांतर अतिठळक कमी दाबाच्या क्षेत्रात होण्याच्या शक्यतेमुळे येत्या १५, १६ आणि १७ सप्टेंबरला राज्यातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
तर येत्या ४८ तासांत कोकण आणि परिसरात विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड भागातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तसेच, येत्या ४८ तासात मराठवाड्यातील परभणी, हिंगोली आणि विदर्भातील गांदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांतील बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तर घाट विभागातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज देशभरात कसे असेल हवामान ?
स्कायमेट हवामानानुसार, पुढील 24 तासांत ओडिशा, किनारी आंध्र प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, विदर्भ आणि तेलंगणामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर पंजाब, हरियाणाचा काही भाग, पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटे, सिक्कीम, ईशान्य भारत, मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस आहे. होण्याची शक्यता आहे.
त्याचप्रमाणे कोकण आणि गोवा, किनारी कर्नाटक, केरळ, जम्मू-काश्मीर, दिल्ली, पूर्व गुजरात, मध्य महाराष्ट्र, आंध्र प्रदेशचा दक्षिण किनारा, अंतर्गत कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.