शेतीशिवार टीम, 10 जानेवारी 2022 : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. आज तर कोरोना रुग्णांची संख्या पाहता कोरोनाचा वेग हा अनियंत्रित झाला असून भयावह रुग्णवाढ झाल्याची परिस्थिती समोर आली आहे.

कोरोना व्हायरसच्या गेल्या 24 तासांत 1 लाख 79 हजार 729 नवे रुग्ण आढळून आले असून, 146 जणांनी आपला जीव गमावला आहे. यानंतर देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 3 कोटी 57 लाख 7 हजार 727 झाली आहे.

तर, या महामारीमुळे आतापर्यंत एकूण मृतांची संख्या 4 लाख 83 हजार 936 वर गेली आहे. कोरोनाच्या नवीन प्रकरणानंतर आता सक्रिय रुग्णांची संख्या 7 लाख 23 हजार 619 झाली आहे. मात्र, आतापर्यंत 3 कोटी 45 ​​लाख 172 लोक कोरोना महामारीतून बरे झाले आहेत.

ओमिक्रॉनचा आकडाही 4 हजारांच्या पुढे… 

देशातील ओमिक्रॉन व्हेरियंट रुग्णांची एकूण संख्या 4,033 वर पोहोचली आहे. महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये ओमिक्रॉनची सर्वाधिक 1,216 आणि 529 प्रकरणे आहेत. ओमिक्रॉनच्या 4,033 रुग्णांपैकी 1,552 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ओमिक्रॉनचा वाढता धोका आणि कोरोनाचा अनियंत्रित वेग यांच्यामध्ये लसीकरण मोहीम जोमाने राबवली जात आहे.

आतापर्यंत 151 कोटी लसीकरण डोस देण्यात आले आहेत. रविवारी देशभरात एकूण 13 लाख 52 हजार 717 नमुने तपासण्यात आले. म्हणजेच कालपर्यंत 69 कोटी 15 लाख 75 हजार 352 नमुना चाचण्या झाल्या आहेत.

राज्यात संसर्गाचे 44,388 नवे रुग्ण, 12 रुग्णांचा मृत्यू :-

रविवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 44,388 रुग्ण समोर आल्यानंतर एकूण बाधितांची संख्या 69,20,044 वर पोहोचली आहे. याशिवाय 12 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1,41,639 वर पोहोचला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली.

एक दिवसापूर्वी राज्यात 41,434 कोरोना विषाणूची लागण झाली असून 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने सांगितले की, दिवसभरात 15,351 लोक संसर्गातून बरे झाल्यानंतर, बरे झालेल्यांची संख्या 65,72,432 झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *