शेतकऱ्यांच्या घरात असलेला कापूस आता व्यापाऱ्यांच्या हातात गेल्यानंतर दरात काही प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. साडेसात हजारांवर असलेले कापसाचे भाव सध्या 8000 ते 8200 रुपयांपर्यंत पोहचले आहेत. येणाऱ्या दिवसात कापसाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यात यंदा कापसाचे उत्पन्न चांगले झाले. मात्र, सुरुवातीला नऊ हजार रुपये क्विंटलने विक्री झालेला कापूस नंतर घसरला. नऊ हजारांवरून कापसाचे दर थेट 8300 त्यानंतर 8000 व गत महिन्यात साडेसात हजारांवर आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्री थांबवली होती.
मात्र, घरात साठवलेल्या कापसात खाज येणारे किडे होऊ लागल्यामुळे तसेच अनेकांचे पैसे देणे असल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने का होईना कापसाची विक्री करावी लागली. मात्र, आता कापूस शेतकऱ्यांच्या हातातून व्यापाऱ्याकडे गेला आहे. दरातही काही प्रमाणात सुधारणा होत आहे. गेल्या दोन दिवसांत कापसाला 8200 ते 8500 रुपयांचा दर मिळाला.
येणाऱ्या काही दिवसात कापूस दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, या वाढीव दराचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच अधिक प्रमाणात होणार आहे. शेतकरी आता घरात साठवणूक करून ठेवलेला कापूस विक्रीसाठी बाजारपेठेत आणत असल्याचे ग्रामीण भागात दिसून येत आहे.
कमळेश्वरात चण्याला 5 हजार 335 रुपये इतका भाव..
महाराष्ट्र स्टेट को – ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन मुंबई व केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडतर्फे चणा खरेदीला सुरुवात झाली. कळमेश्वर तालुका खरेदी – विक्री सहकारी समितीच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती येथे 5 हजार 335 रुपये इतका भाव मिळाला. खरेदी – विक्री संस्थेचे अध्यक्ष बाबाराव कोहे यांच्या हस्ते काटापूजन करण्यात आले.
यावेळी बाजार समिती सभापती बाबाराव पाटील, सभापती प्रभाकर भोसले, संचालक संजय ठाकरे, खरेदी – विक्री समितीचे उपाध्यक्ष आशिष देशमुख, बाजार समिती उपसभापती प्रतिभा पालटकर, पंचायत समिती माजी उपसभापती नरेंद्र पालटकर, खरेदी- विक्री संस्थेचे संचालक विठ्ठल हिवरे, सरपंच धर्माजी आसोले, संचालक दामोदर ठाकरे, प्रभाकर रानडे, विजय ठाकरे, नरेश गोतमारे, विजय गिरी, सतीश नदि, बोरगाव सरपंच श्रीराम घोटे, बाजार समिती सचिव अभय राऊत, ग्रेडर देवराव राऊत, राहुल मुलमुले, राहुल कुथे, अण्णा चव्हाण आदींची उपस्थित होती.