नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीच्या वतीने नगर तालुक्यात झंझावाती प्रचार दौरा बुधवार (दि.२४) पासून सुरू करण्यात आला आहे. नगर तालुक्यात भातोडी येथुन प्रचार दौऱ्याचा प्रारंभ करण्यात आला, त्यास जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते संपतराव म्हस्के, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उध्दवराव दुसुंगे, तालुकाध्यक्ष रोहिदास कर्डिले, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांच्या सह स्थानिक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दि. १ मे पर्यंत दररोज तालुक्यातील गावागावात हा दौरा काढला जाणार असून त्यात सहभागी होण्याचे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष रोहिदास कर्डिले, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण म्हस्के यांनी केले आहे.
निलेश लंके यांच्या उपस्थितीत गुरुवारी मोटारसायकल रॅली..
महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे गुरुवारी (दि.२५) सकाळी ८ वाजता नगर तालुक्यातील मेहकरी फाटा येथे उपस्थित राहणार असून, त्यांच्या उपस्थितीत मेहकरी फाटा ते कौडगाव भव्य मोटारसायकल रॅली होणार असून जास्तीत जास्त तरुणांनी व ग्रामस्थांनी सहभागी व्हावे. असे आवाहन पंचायत समितीचे माजी सभापती संदीप गुंड यांनी केले आहे.