वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे देशातील शेतकऱ्यांचे कायमच मोठे नुकसान होत असते. अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बंधूंचे मोठे नुकसान होते. परिणामी, शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा भुर्दड सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना थोडेफार आर्थिक हातभार लाभावा या हेतूने केंद्र शासनाकडून 2016 पासून पीकविमा योजना राबवली जात आहे.
पीएम फसल बीमा योजना (पंतप्रधान पीकविमा योजना) असे या योजनेचे नाव असून, खरीप आणि रब्बी हंगामासाठी या योजनेंतर्गत पिकांचा विमा उतरवला जाऊ शकतो.
पंतप्रधान पीकविमा योजना म्हणजे काय ?
प्रधानमंत्री पीकविमा विमा योजनेंतर्गत, पूर, पाऊस, भूस्खलन, दुष्काळ इत्यादी किंवा कीटक, रोगांसारख्या नैसर्गिक कारणांमुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी सरकारकडून भरपाई दिली जाते. त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा योजनेत नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे, त्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास ते ७२ तासांच्या आत संबंधित विमा कंपनीला माहिती देऊन विमा संरक्षणाचा लाभ मिळवू शकतात.
फॉर्म भरण्याची अंतिम तारीख गहू (बागायत), हरभरा, रब्बी कांदा 15 डिसेंबर 2022 आणि उन्हाळी भुईमूग – 31 मार्च 2023
पीकनिहाय विमा रक्कम ( प्रतिहेक्टरी ) हप्ता ( रुपयांत )
गहू 38,000 570 रुपये
हरभरा 35,000 525 रुपये
उन्हाळी भुईमूग 40,000 600 रुपये
रब्बी कांदा 80,000 4000 रुपये
हे शेतकरी अर्ज भरण्यास असतील पात्र
अधिसूचित पिके घेणारे तसेच कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. कर्जदार आणि बिगरकर्जदार शेतकऱ्यांचा सहभाग मात्र ऐच्छिक आहे.
या संकटात होतो फायदा
पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड रोगराई यामुळे उत्पन्नात येणारी घट यामुळे नुकसान झाल्यास नुकसानभरपाई दिली जाते.
रब्बी पीकविमा काढा ऑनलाइन
आपले सरकार केंद्रावर जाऊन तर पीकविमा काढता येतोच मात्र रब्बी हंगामाचा पीकविमा शेतकरी स्वतः ऑनलाईन काढू शकतात. तसेच ऑनलाइन विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांचे बँक पासबुक , शेतकऱ्यांचा सातबारा व आठ अ उतारा , तसेच पीक पेरा प्रमाणपत्र लागणार आहे.
शेतकरी खरिपातील कोणत्या पिकांचा काढू शकता विमा
खरीप पिकांमध्ये ज्वारी, बाजरी, मका, मूग, उडीद, अरहर, हरभरा आणि सोयाबीन याशिवाय तीळ, भात, कप, पतंग आणि भुईमूग यांचा समावेश होतो. शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत खरीप पिकांचा विमा काढता येतो.
पंतप्रधान पीक विमा योजनेची वैशिष्ट्ये (प्रधानमंत्री फसल विमा योजना)
पीएम फसल विमा योजना 13 जानेवारी 2016 रोजी सुरू करण्यात आली.
या योजनेंतर्गत खरीप, रब्बी आणि व्यावसायिक पिकांचा विमा उतरवला जातो. पेरणीनंतर 10 दिवसांच्या आत तुम्ही तुमच्या शेतात कोणते पीक पेरले आहे हे विमा कंपनीला सांगावे लागते.
शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी 2 टक्के आणि रब्बी पिकासाठी 1.5 टक्के प्रीमियम भरावा लागतो.
वार्षिक, व्यावसायिक आणि बागायती पिकांसाठी प्रीमियम दर 5 टक्के ठेवण्यात आला आहे. उर्वरित रक्कम सरकार उचलते.
या योजनेंतर्गत सरकार 80 टक्क्यांहून अधिक रक्कम अनुदानाच्या स्वरूपात देते.
नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी विमा कंपनी नुकसान भरपाई देते. यासाठी शेतकऱ्याने पिकाचे नुकसान झाल्याच्या ७२ तासांच्या आत संबंधित विमा कंपनीला कळवावे.
पीक विमा योजनेंतर्गत केवळ ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पीक नुकसानीची भरपाई दिली जाते.
खरीप पिकांच्या विम्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 निश्चित करण्यात आली आहे.