ब्रेकिंग : नाथाभाऊंकडून पुन्हा एकदा भाजपचा ‘करेक्ट’ कार्यक्रम ; नगराध्यक्षांसह 21 नगरसेवकांच्या हाती घड्याळ…
शेतीशिवार टीम,17 डिसेंबर 2021 :- माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांनी पक्षबांधणीला सुरूवात केली आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सक्रिय झाल्याचं दिसत आहे.
अशातच भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठा हादरा दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज भुसावळा मधील भाजपच्या नगराध्यक्षांसह 21 नगरसेवक तसेच सावदा ता. रावेर येथील नगराध्यक्षा अनिता येवले यांच्यासह आठ नगरसेवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपला एकनाथ खडसेंनी मोठं खिंडार पाडलं आहे.
भाजपच्या पधाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू झाले आहे. त्यामुळे नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे.
भाजपचं जळगावमध्ये हे मोठे डॅमेज आहे, भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांना खडसेंनी शह दिला आहे.
पक्षप्रवेश सोहळ्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, एकनाथ खडसे यांनी 40 वर्षे भाजपसाठी काम केलं परंतु जळगाव जिल्ह्यातील सोन्याची किंमत सर्वांनाच कळते असे नाही, आज एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीत येण्याने आनंद झाला, आता संपूर्ण जळगाव जिल्हा राष्ट्रवादीमय करायचा आहे, असे अजित पवार म्हणाले.