शेतीशिवार टीम, 2 जानेवारी 2022 : उत्तराखंडातील नैनिताल जिल्ह्यातील भवाली-अल्मोडा NH मध्ये असलेल्या सुयलबारी जवाहर नवोदय विद्यालयात आज 85 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे.
यामुळे संपूर्ण सुयलबारी परिसर कंटेनमेंट झोन करण्यात आला आहे. या मुलांना शाळेतच आयसोलेशन करण्यात आलं आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे नमुने ओमिक्रॉन टेस्टसाठी दिल्लीला पाठवण्यात आले आहे.
सध्या सुयालबारी जवाहर नवोदय विद्यालयात 600 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नुकतीच खबरदारीचा उपाय म्हणून शाळेत सर्व विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी झाली.
बुधवारी तीन विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळले, तर गुरुवारी आठ विद्यार्थी आणि शाळेच्या मुख्याध्यापकांनाही कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली. कोरोना सॅम्पलिंग प्रभारी गिरीश पांडे यांनी सांगितले की, शनिवारी आलेल्या अहवालात आणखी 85 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.
परंतु अजून काही विद्यार्थ्यांचे अहवाल येणं बाकी असून बाधितांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. कोरोनाबाधित विद्यार्थ्यांपैकी 70 टक्के विद्यार्थ्यांना ताप, खोकला, सर्दी आदी लक्षणे आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी धोक्याचा इशारा दिला आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत सक्रिय रुग्णसंख्या 2 लाखांवर जाईल, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.