शेतीशिवार टीम,20 डिसेंबर 2021 :- बॉलिवूडचे दिग्गज महानायक अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या राय बच्चन सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाली आहे. Panama Papers प्रकरणी ईडीने (ED) त्यांना नोटीस बजावून हजर राहण्यास सांगितलं होतं.
यापूर्वीही ऐश्वर्या राय बच्चनला नोटीस बजावण्यात आली होती, मात्र तिने दोनदा हजर राहण्यापासून सूट मागितली होती. एजन्सीने परकीय चलन व्यवस्थापन कायद्यांतर्गत ऐश्वर्याचं विधान नोंदवलं आहे.
इंडिया गेटजवळील ईडी (ED) कार्यालयात हजर झालेल्या ऐश्वर्या रायने काही कागदपत्रेही एजन्सीला दिली आहेत. 2016-17 पासून बच्चन कुटुंबाविरुद्ध ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे.
ईडीने (ED) बच्चन कुटुंबाला नोटीस बजावून 2004 नंतर परदेशातून किती पैसे मिळाले किंवा पाठवले याची विचारणा केली होती. यानंतर बच्चन कुटुंबाकडून काही कागदपत्रे सुपूर्द करण्यात आली.
पनामा पेपर्स लीकमध्ये ज्या 500 भारतीयांचा उल्लेख करण्यात आला त्यात ऐश्वर्या राय बच्चनचं नाव आहे. या यादीत ऐश्वर्या राय बच्चनचे सासरे अमिताभ बच्चन यांचेही नाव आहे. मात्र, अद्याप त्यांच्या बाजूने काहीही विधान आलेलं नाही.
ऐश्वर्या राय बच्चनपूर्वी तिचा पती अभिषेक बच्चन याचीही (ED) ने चौकशी केली होती. इतकेच नाही तर काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, लवकरच अमिताभ बच्चन यांचीही या प्रकरणी एजन्सीकडून चौकशी केली जाऊ शकते.
पनामा पेपर्स प्रकरणात भारतातील सुमारे 500 लोकांचा सहभाग असल्याचा दावा करण्यात आला होता. यामध्ये देशातील अनेक नेते, अभिनेते, उद्योगपतींसह अनेक प्रसिद्ध लोकांचा समावेश आहे.
पनामा पेपर्स घोटाळा 3 एप्रिल 2016 रोजी सुरू झाला जेव्हा कंपनीच्या डिजिटल संग्रहणातून सुमारे 11.15 दशलक्ष फायली लीक झाल्यानं खळबळ उडाली होती.