शेतीशिवार टीम : 23 ऑगस्ट 2022 :- अतिवृष्टी नुकसान भरपाई : 2022 च्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय काल 22 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसान भरपाईची मदत ही दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर ही मदत किती दिली जाईल? काय आहे पात्रता अटी निकष ? याबद्दलची सर्व माहिती आपण शेतीशिवारच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत…
महत्वाचं अपडेट :-
अतिवृष्टी नुकसान भरपाई 2022 -23 साठी केंद्र शासनाच्या NDRF – 2700 कोटी व SDRF – 900 कोटी असा एकूण 36 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. यापैकी 1300 कोटींचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आठवडाभरात याचा लाभ पोहचणार आहे.
पूर, चक्रीवादळ, अतिवृष्टी या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते.
राज्यात जुलै, 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे विविध जिल्हयात शेतीपिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्याबाबत तसेच इतर नुकसानीकरिता मदत देण्याबाबत दि. 10.08.2022 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.
सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार प्रस्तुत प्रकरणी शासन आदेश निर्गमित करत जून ते ऑक्टोबर : 2022 या कालावधीतील अतिवृष्टी, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्हयात होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे.
*जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत :- रू.13600/- 3 हेक्टरच्या मर्यादेत.
*बागायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत :- रू.27,000/- 3 हेक्टरच्या मर्यादेत.
*बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत :- रू. 36,000/- 3 हेक्टरच्या मर्यादेत.
1) जून ते ऑक्टोबर, 2022 या कालावधीकरिता शेतीपिकांच्या नुकसानीव्यतिरिक्त इतर बाबीकरीता निश्चित केलेल्या दरानुसार मदतीचे वाढीव दर लागू करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
2) राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधील विहित निकषाव्यक्तीरिक्त अथवा दरापेक्षा अधिक दराने देण्यात येणाऱ्या मदतीची रक्कम वरील विवरणपत्रात दर्शविण्यात आल्याप्रमाणे राज्य शासनाच्या निधीतून त्या त्या लेखाशीर्षाखाली खर्च करण्यात यावी.
3) मदतीची रक्कम प्रदान करण्यासाठी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या इतर अटी व शर्ती लागू राहतील. तसेच शेतीपिकांचे नुकसानीकरिता संपूर्ण हंगामामध्ये एकाच वेळी अनुदान अनुज्ञेय आहे.
पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत. त्यानंतरच यासाठी निधी वितरीत केल्यानंतर रक्कम आहरित करून लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित करावी.
सदर निधी अनावश्यकरित्या आहरित करून बँक खात्यामध्ये काढून ठेवण्यात येवू नये. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्हयांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावा.
तसेच लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील केंद्र शासनाच्या ndmis.mha.gov.in या संकेतस्थळावरील प्रणालीमध्ये भरण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी यांनी करावी. असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.