सिडको महामंडळातर्फे 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर महागृहनिर्माण योजना जानेवारी 2024 चा प्रारंभ करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत तळोजातील नवी मुंबई मेट्रो आणि द्रोणागिरी नोडशी जोडणाऱ्या भारतातील सर्वात लांब सागरी सेतू एमटीएचएल (MTHL) च्या सान्निध्यात 3322 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या महागृहनिर्माण योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस 26 जानेवारी 2024 पासून सुरुवात झाली असून, या योजनेची संगणकीय सोडत 19 एप्रिल 2024 रोजी काढण्यात येणार आहे.
या महागृहनिर्माण योजनेतील 3322 सदनिकांपैकी द्रोणागिरी नोड येथील 61 व तळोजा नोड येथील 251 याप्रमाणे 312 सदनिका या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी उपलब्ध आहेत, तर द्रोणागिरी येथील 374 व तळोजा येथील 2336 याप्रमाणे 3010 सदनिका या सर्वसाधारण घटकांसाठी उपलब्ध आहेत.
योजनेच्या ऑनलाइन नोंदणी व सविस्तर माहितीकरता https://lottery.cidcoindia.com हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नोंदणी सहाय्यासाठी नागरीकांनी 7065454454 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
ऑनलाईन नोंदणीसाठी https://lottery.cidcoindia.com/App/NewUser.do या लिंकवर क्लिक करा.
नवी मुंबई मेट्रोजवळील तळोजा आणि भारतातील सर्वात लांब सागरी सेतू एमटीएचएला जोडणाऱ्या द्रोणागिरी नोड येथील सिडको महागृहनिर्माण योजना जानेवारी 2024 मध्ये नोंदणी करून घर खरेदी करण्याच्या या सुवर्णसंधीचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन सिडकोतर्फे नागरिकांना करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोने प्रजासताक दिनानिमित्त सिडको महागृहनिर्माण योजना जानेवारी – 2024 सादर केली आहे. या योजनेंतर्गत तळोजा आणि द्रोणागिरी नोड्समध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि सर्वसाधारण घटकांतील नागरिकांसाठी 3322 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा..
– अनिल डिग्गीकर, व्यवस्थापकीय संचालक सिडको.