यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात घोणसरा आणि बर्गेवाडी शेतशिवारात छुप्या पद्धतीने गांजाची शेती करून मोठी उलाढाल करणाऱ्या चार संशयित शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. एलसीबी पथकाच्या या कारवाईने सामूहिक गांजा शेतीचा पर्दाफाश झाला आहे. या शेतीतून उत्पादन होणाऱ्या गांजाची खेप मुंबई, लातूरमध्ये जात होती, अशी माहितीही आता समोर आली आहे.
देविदास ढाकरे, सुखदेव ढाकरे, वनदेव ढाकरे (सर्व रा. घोणसरा), फालसिंग राठोड (रा. मोहदी) अशी संशयितांची नावे आहेत. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर उमरखेड आणि महागाव दोन तालुके आहे. या तालुक्यांना मराठवाडा लागूनच आहे. महागाव तालुक्यात छुप्या पद्धतीने अतिदुर्गम भागात असलेल्या घोणसरा, बर्गेवाडीत गांजाची सामूहिक शेती सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली.
त्यावरून पोलिसांचा मोठा फौजफाटा महागाव तालुक्यात धडकला. 25 ते 30 एकरांतील गांजा शेती पाहून पोलिसांनाही धक्काच बसला. यावेळी चौघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. सकाळपासून तर सायंकाळपर्यंत चाललेल्या या कारवाईत शेतातील गांजा पिकाची कापणी केल्यानंतर 15 क्विंटल गांजा जप्त करण्यात आला.
घोणसरा, बर्गेवाडी शिवारात पिकविण्यात येणाऱ्या गांजाचे थेट लातूर आणि मुंबई कनेक्शन असल्याचेही या कारवाईनंतर समोर येत आहे. लातूर येथे हॉटेल व्यवसाय करणारा ‘गनी’ नामक व्यक्ती गांजाची खेप घेऊन जात असल्याची चर्चा घोणसरा गावात आता ऐकायला मिळत आहे. शिवाय मुंबई येथून काही घाऊक खरेदीदार घोणसरा येथे गांजा खरेदीसाठी येत होते, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनीही या गांजा शेतीवरील कारवाई दरम्यान घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.
शेतकऱ्यांचा गांजा शेतीकडे कल का ?
महागाव तालुक्यातील घोणसरा, बगेवाडी येथे आज तिसऱ्या दिवशीही स्थानिक गुन्हे शाखेकडून गांजाप्रकरणी कारवाई सुरूच होती. त्यामुळे गांजा उत्पादक शेतकऱ्यांचे धाबे दणाणून गेले आहे. पाचव्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल असून, खरीप हंगाम सोडून गांजाची शेती करण्याची वेळ शेतकऱ्यांवर का आली, असा प्रश्न निर्माण होत आहे. हिरासिंग बाबुलाल राठोड रा. मोहदी असं पाचव्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर अनेक शेतकऱ्यांना शेतातील गाजा उपटून नष्ट केल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत पाच ठिकाणी गांजाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
शेतीचे स्वरुप अशा पद्धतीने बदलत असेल तर कृषी प्रधान देशासाठी ही बाब निश्चितच चिंतेची आहे. या कारवाईनंतर शेतकऱ्यांवर गांजा पीक घेण्याची वेळ का आली, हे तपासणे देखील गरजेचे झाले आहे. गांजाची शेती केल्यावर 20 वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
मात्र त्यानंतरही तालुक्यातील शेतकरी गांजाची शेती का करत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अजूनही अनेक ठिकाणी अशाप्रकारे गांजाचे उत्पादन घेतले जात आहे. मात्र ते अद्याप उघडकीस आलेले नाही. शेती व्यवसायातील धाक आणि सरकारची धोरणे देखील याला जबाबदार असल्याचे आता बोलले जात आहे.
शेतमालाला कवडीमोल भाव..
हंगाम कोणताही असो शेतीमालाचे दर हे दिवसेंदिवस घटत आहेत. खरीप हंगामात पावसामुळे सोयाबीन, उडीद, तूर पिकांचे नुकसान झाले तर पुन्हा बाजारात या पिकांना कमी दर मिळतो. शेती माल पिकवायचा शेतकऱ्यांनी आणि भाव ठरवायचा व्यापाऱ्यांनी या धोरणामुळे अनेकांनी जीवनयात्रा संपविल्याचे वास्तव आहे.
शेतकरी घटक हा असंघटित असल्याने त्याचा वापर राजकीय नेते आणि प्रशासन या दोघांकडूनही सोईस्कररित्या सुरू आहे. हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनचे दर 11 हजार 500 वर पोहचले होते तर महिन्याभरातच आवक वाढताच दर 4 हजार 800 वर आले. एवढी तफावत पाहता शेतकऱ्यांनी काय करायचे, असा प्रश्न निर्माण होत आहे.