शेतीशिवार टीम : 1 सप्टेंबर 2022 : राज्यात महसूल व शेतीच्या वादावरील असंख्य तक्रारी व न्यायनिवाडे प्रलंबित आहेत .20 ते 25 वर्ष या बाबतचे निकालही लागत नसून दिवसेंदिवस शेती संबंधीचे वाद वाढत आहेत.
यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी बोरी बुद्रुक येथील शेत जमीन मोजणी समितीने 2017 साली याबाबत एक योजना आराखडा तयार करून गावातील शेतकऱ्यांसमोर मांडला. स्मार्ट व्हिलेज प्रकल्प अंतर्गत गावातील शेत जमीन मोजणी करण्याची संकल्पना पुढे आणली. परंतु, त्यावेळी अल्प प्रमाणात शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला. या समितीला पुढील काळात अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.
परंतु, मोजणी समितीने याबाबतचा पाठपुरावा भूमी आभलेख विभागाकडे सातत्याने केला असून प्रयत्नात्नांना यश येताना दिसत आहे. दरम्यान, बोरी गावांमध्ये 1609 हेक्टर क्षेत्र असून 1777 गट आहेत . या गटापैकी 1360 गटधारकांनी मोजणी अर्ज व मोजणी फी जमा केली असून उर्वरित 417 गटांचे अर्ज व फी लवकरच जमा होतील, अशी माहिती मोजणी समितीचे रंजन जाधव यांनी दिली आहे.
सोमवारी ( दि.29) पासून ड्रोन मोजणी प्रारंभ करण्यात आला असून या माध्यमातून गावातील संपूर्ण शेतजमिनींचे प्रतिमा अथवा नकाशे तयार करण्यास सुरुवात करण्यात आले आहे. हे नकाशे व भूमी अभिलेख कार्यालयकडील उपलब्ध शेत जमिनीचे नकाशे जुळवले जातील.
यानंतर कुठे अतिक्रमण आहे किंवा कुठे तफावत झाले हे पाहून शेतकऱ्यांना रोव्हर साहाय्याने हद्दी कायम करून दिल्या जातील. तद्नंतर पत्रक शेतकऱ्यांना दिले जातील अशी माहिती भूमिअभिलेख जुन्नरचे उपाध्यक्ष ए.एस. गांगुर्डे यांनी दिली.
ड्रोन मोजणी वेळी आमदार अतुल बेनके, विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर, माजी सरपंच पुष्पा कोरडे, ग्रा.सदस्य सुनील जाधव, गणेश औटी , कोमल कोरडे, साखर संचालक तबाजी शिंदे, तलाठी शीतल गर्जे, रंजन जाधव, युवराज कोरडे आदी उपस्थित होते.
बोरी बुदुक गावाने हा जो ऐतिहासिक निर्णय घेतला आहे तो अतिशय भूषणावह आहे. मोजणीमुळे हद्दी कायम होऊन आपसातील वाद कायमस्वरूपी मिटतील आणि उभ्या महाराष्ट्रासे बोरी पॅटर्नच नाव घेतले जाईल. – अतुल बेनके , आमदार, जुन्नर