अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ तयार होत आहे. याचा परिणाम मान्सूनच्या गतीवर होणार असून राज्यात मोसमी पाऊस 4 ते 5 दिवस लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
चक्रीवादळामुळे नैऋत्य अरबी समुद्र, कर्नाटक गोवा – महाराष्ट्र किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
तसेच महाराष्ट्र – गोवा किनारपट्टीवर पावसासह सोसाट्याचा वारा वाहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. समुद्रावर दक्षिण पूर्व अरबी चक्रीवादळ तयार झाले आहे. हे चक्रीवादळ सरासरी समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटरपर्यंत पसरले आहे. या चक्रीवादळामुळे पुढील 24 तासांत दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची दाट शक्यता आहे.
परंतु आता हाती आलेल्या हवामान विभागाच्या माहितीनुसार, ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ हे किनारपट्टी पासून 1,000 किलोमीटर दूर असल्यानं कोकण किनारपट्टीला धोका नसल्याची माहिती आता समोर आली आहे. या काळात मच्छीमारांनी खोल समुद्रात जाण्यापासून मनाई करण्यात आली आहे.
राज्यात मान्सूनपूर्व पाऊस..
राज्यात मान्सूनपूर्व पाऊस सुरू असून मंगळवारी राज्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली. कोकणातील डहाणूमध्ये 2 मिमी, विदर्भातील अमरावतीमध्ये 7 मिमी पावसाची नोंद मंगळवारी सायंकाळपर्यंत झाली.
दरम्यान, 7 ते 10 जूनदरम्यान कोकणात किनारपट्टीवर पावसासह सोसाट्याचा वारा वाहणार आहे. तसेच मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात याचदरम्यान तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
विदर्भात हवामान कोरडे राहणार आहे. मंगळवारी राज्यात सर्वात जास्त तापमान ब्रह्मपुरीमध्ये 43.8 अंश सेल्सिअस, तर सर्वात कमी तापमान महाबळेश्वरमध्ये 17.6 अंश सेल्सिअस होते.
चार जिल्ह्यांना अलर्ट..
‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे राज्यातील काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात 4 जिल्ह्यांना हा अलर्ट देण्यात आला आहे.
पुढील 3 ते 4 तासात जळगाव, नाशिक, अहमदनगर, छ. संभाजीनगर या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह वादळी पावासाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. परंतु हा पाऊस मान्सून नाही, यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा आदेश कृषी विभागाने दिला आहे.