मनमाड – इंदूर रेल्वेमार्ग हा दोन टप्प्यात होणार असून यासाठी 9 हजार कोटी रूपये रेल्वे बजेटमध्ये मंजुर झाले आहेत. धुळे – नरडाणा हा याच रेल्वे मार्गाचा भाग असून हे 56 कि.मी.चे काम पुर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टण्याचे काम होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी धुळे – दादर एक्सप्रेसच्या शुभारंभप्रसंगी व्हीसीव्दारे बोलतांना केले.

खान्देशातील रेल्वेप्रश्न खा. डॉ. सुभाष भामरे नेहमीच मांडत असतात. त्यांच्या आग्रहामुळेच आता धुळे – दादर रेल्वेही सुरू करण्यात आली आहे. या रेल्वेला प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिल्यास ही रेल्वे नियमित सुरू केली जाईल, असे आश्वासनही मंत्री दानवे यांनी यावेळी दिले. धुळे ते मुंबई स्वतंत्र रेल्वेची धुळेकरांची काल अखेर स्वप्नपूर्ती झाली. सकाळी 11 वाजता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याहस्ते व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे तर खा. डॉ. सुभाष भामरे यांनी हिरवी झेंडी दाखवून या रेल्वेचा शुभारंभ झाला.

यावेळी व्हीसीव्दारे मध्यरेल्वेचे महाप्रबंधक नरेश लालवाणी, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, खा.उन्मेश पाटील, आ.मंगेश चव्हाण उपस्थित होते.

यावेळी खा.डॉ. भामरे म्हणाले की, धुळवाहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे धुळे ते मुंबई अशी स्वतंत्र रेल्वे सुरू करण्याची धुळेकरांची मागणी होती. ती आज प्रत्यक्षात पुर्ण झाली आहे. धुळे – दादर रेल्वे ही प्रायोगिक तत्वावर असली तरी ती पुढे कायम सुरू राहण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच धुळे ते पुणे रेल्वे सुरू करण्याचे प्रयत्न असून प्रवाशांनी धुळे – दादर रेल्वेसेवेला प्रतिसाद द्यावा , असे आवाहनही त्यांनी केले.

असे आहे वेळापत्रक 

धुळे – दादर रेल्वे ही दि. 30 एप्रिल ते दि. 30 जुनदरम्यान धुळे येथून सोमवार, मंगळवार आणि शनिवारी सकाळी 6.30 वाजता सुटेल.

दुपारी 13.15 वाजता दादरला पोहचेल. तर दादर येथून रविवार, सोमवार आणि शुक्रवारी दुपारी 16.15 ला सुटेल तर धुळे येथे रात्री 23.25 ला पोहचेल.

या 11 स्टेशन्स वर थांबणार..

शिरूड, जामधा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि ठाणे.

मनमाड – इंदूर रेल्वेची वैशिष्ट्ये :-

– भूसंपादन :- 2008 हेक्टर
– महाराष्ट्रात :- 996 हेक्टर
– मार्गाचा प्रकार :- विद्युत, ब्रॉडगेज
– लांबी :- 362 किमी
– मध्य प्रदेशात :- 176 किमी
– महाराष्ट्रात :- 186 किमी
– मार्गावर स्थानके :- 13
– गती :- 120 प्रती किमी
– प्रकल्प किंमत :- 9000 कोटी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *