ध्वनी प्रदूषणास आळा घालण्यासाठी इलेक्ट्रिक रिक्षांना महापालिका 30 हजार रूपयांचे अनुदान देणार आहे. त्यासाठी नाव नोंदणी व अर्ज करण्यास 7 जुलैपासून नियोजन पालिकेच्या विद्युत विभागाने केले आहे. केवळ 2 जुलै 2021 नंतरच्या एल फाईव्ह एम या क्षेणीतील प्रवासी इलेक्ट्रिक रिक्षांना हे अनुदान मिळणार आहे.
शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा अंगीकार करण्यासाठी इलेक्टिक वाहन (ईव्ही) धोरणाची अंमलबजावणी पालिका करीत आहे. शाश्वत विकासाच्या उद्दिष्ट्यांमध्ये हवेचा दर्जा चांगला राखणे, ध्वनी प्रदूषण नियंत्रण, हरितगृह वायू उत्स नामध्ये घट आणि ऊर्जा सुरक्षेचा समावेश आहे.
वाहनांमुळे होणारे प्रदूषण शहरातील हवा प्रदूषणाचा प्रमुख स्त्रोत आहे. त्यामुळे शून्य वायू उत्सर्जन करणाऱ्या वाहनांचा अंगीकार होणे अत्यंत गरजेचे आहे. ही बाब ओळखून या धोरणाअंतर्गत पालिका शहरातील तीनचाकी इलेक्ट्रिक रिक्षांना अनुदान देणार आहे.
पहिल्या 1 हजार 500 रिक्षाचालकांना महापालिकेने ईव्ही धोरणाची अंमलबजाणी सुरू केली आहे. या अनुदानाचे वितरण केले जाणार आहे. त्यासाठी 7 जुलैपासून ऑनलाइन अर्ज भरून घेण्यास सुरूवात झाली आहे. त्या दृष्टीने पालिका प्रशासनाने तयारी केली आहे.
अनुदानासाठी नावनोंदणी कशी करणार ?
पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर ईव्ही सेल या शीर्षकावर क्लिक केल्यानंतर इ ऑटो इन्सेटिव्ह स्किम यावर क्लिक केल्यानंतर अर्ज भरावा. सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी .
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर नेहरूनगर, पिंपरी येथील कार्यशाळेत प्रत्यक्ष अर्ज व आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.
या योजनेत केंद्राकडून 50 हजार आणि राज्य शासनाकडून 30 हजारांचे अनुदान इलेक्ट्रिक रिक्षामालकास दिले जात आहे. या तीनचाकी रिक्षाची साधारण 3 लाख इतकी किंमत आहे. केवळ पहिल्या दीड हजार रिक्षांना अनुदान महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रथम रिक्षामालकांची नाव नोंदणी केली जाणार आहे.
त्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वानुसार पहिल्या 1 हजार 500 रिक्षाचालकांना प्रत्येकी 30 हजारांचे अनुदान देण्याचे नियोजन आहे, असे पालिकेच्या विद्युत विभागाचे सहशहर अभियंता बाबासाहेब गलबले यांनी सांगितले.