विखेंकडून 50 लाख रुपयाची ऑफर! अपक्ष उमेदवार गिरीश जाधव यांचा खळबळजनक आरोप..

0

भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या विरोधात हरकत घेऊ नये म्हणून विखे यांच्या समर्थकांनी ५० लाख रूपयांची ऑफर दिली होती असा खळबळजनक आरोप अपक्ष उमेदवार गिरीश जाधव यांनी केला आहे. आम्ही अनिलभैय्या राठोड यांचे मावळे आहोत. ५० लाखाच्या ऑफरला आम्ही भिक घालणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी विखे यांच्या अर्जावर घेतलेल्या हरकती फेटाळल्या असल्या तरी त्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात दाद मागण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

डॉ. सुजय विखे यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर अपक्ष उमेदवार गिरीश जाधव यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्जांच्या छानणी प्रसंगी दोन हरकती नोंदविल्या होत्या या हरकतींवर बराच खल होऊन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी नऊ तासानंतर विखे यांचा अर्ज वैध ठरविला. त्यानंतर गिरीश जाधव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

जाधव म्हणाले, विखे यांनी शासनाची वन विभागाची ५०० एकर जमीन १ रूपया देऊन आपल्या संस्थेसाठी घेतली, त्यांच्याकडे शासनाची ८०० ते ८५० एकर जमीन असून या जमिनीवर खाजगी कॉलेज उभारून लोकांकडून करोडो रूपयांच्या देणग्या घेत आहेत त्यावर मी हरकत घेतली होती. महानगरपालिकेची तीन कोटी रूपयांची पाणी पट्टी सर्वसाधारण सभेत भाजपाचे महापौर असताना ही पाणी पट्टी माफ करून घेण्यात आली. सुचक, अनुमोदक तसेच महापौर हे भाजपाचे यांनी सर्वांनी मिळून महापालिकेची लुट केली आहे. त्यासंदर्भात मी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्यासाठी गेलो होतो असे जाधव म्हणाले.

जिल्हाधिकारी यांनी मी घेतलेल्या दोन्ही हरकती फेटाळून लावल्या. त्या कोणत्या मुद्दावर फेटाळल्या याचे स्पष्टीकरण देण्यात आले नाही. सहकारी संस्थांचा संबंध नसतो असे जिल्हाधिकारी सांगतात. सहकारी संस्थांचे तुम्ही थकबाकीदार असले अर्ज बाद होतो. विखे यांनी सरकारी जागेवर दिडशे कोटींचे कर्ज घेतले आहे. महापालिकेची तीन कोटी रूपयांची माफी घेतली यावर कोणी काही बोलायचेच नाही का? असा सवाल जाधव यांनी केला .

विखे यांना माफ करणार नाही..

डॉ. विखे यांनी मागील लोकसभा निवडणूकीत शिवसेना नेते अनिलभैय्या राठोड यांच्याशी गद्दारी केली. पायाला लागलेले असतानाही अनिलभैय्या राठोड यांनी विखे यांचा प्रचार केला होता. रक्तातील साखर वारंवार वाढत असताना, पायाला लागलेले असताना रुग्णालयात उपचार घेऊन वीस – बावीस दिवस रोज प्रचार केला. त्याची विखे यांना लाज नाही. आणि आज ते म्हणतात की, शिवसेनेचे लोक विरोधात आहेत. विरोधात काय सांगता तुमच्यामुळेच अनिल राठोड हे गेले. त्यामुळे विखे यांना आम्ही कधीही माफ करणार नाही असे म्हणाले.

त्यांच्यासोबत फिरणारे विरोधात मतदान करणार.. 

पालकमंत्री राधाकृष्ण विखे आहेत म्हणून आमच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी निकाल दिला. हा निकाल सर्वकालीन नाही उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात जाऊन या निकालास आव्हान देणार आहोत. आम्ही अनिल राठोड यांचे कार्यकर्ते आहोत. त्यांच्यासोबत आज जे लोक फिरत आहेत ते देखील विखे यांच्या विरोधात मतदान करणार असल्याचा दावा जाधव यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.