मृत कुळांच्या वारसांच्या नोंदी नसल्याने त्यांना जमिनींच्या मालकी हक्कापासून वंचित राहावे लागत होते. मात्र, कब्जेदार हक्कांतर्गत आता या वारसांच्या नोंदी होणार असल्याने त्यांना मालकी हक्क मिळून महसूल नजराणा भरल्यास जमिनींची विक्रीही करता येणार आहे. आठवडाभरात ही नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. अशी माहिती समोर आली आहे.

ई – फेरफार प्रणाली सुरू झाल्यानंतर हक्कांमधील इतर कुळांच्या वारसांच्या नोंदी केल्या जात नव्हत्या त्या नोंदी करण्यासाठीची तरतूदच प्रणालीत नव्हती. यातच असे लक्षात आले की कब्जेदार सदराच्या नोंदी करू शकतो. मात्र, कुळांच्या वारसांची नोंद करता येत नाही कब्जेदार सदराच्या नोंदी करताना महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यांतर्गत 6क अर्थात वारसा प्रकरणांची नोंदवही अद्ययावत करावी लागते.

त्यानंतर त्यावर वारसाची नोंद केली जाते. मात्र ही प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी आहे त्यातही एकच बाब नोंदविताना ती दोन वेळा करावी लागत होती. त्यामुळे जमाबंदी आयुक्तालयाने राज्य सरकारला एक प्रस्ताव पाठवला त्यात कब्जेदार सदराच्या नोंदी वारस नोंदीनेच करण्याची मुभा द्यावी त्यामुळे वारसा प्रकरणांच्या नोंदवहीची गरज त्यामुळे भासणार नाही, असे त्या प्रस्तावात मांडण्यात आले.

ही वारसा प्रकरणांची नोंदवही सध्याच्या ई – फेरफार प्रणालीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऑटोजनरेट करता येईल. याच पद्धतीचा वापर करून कुळांसाठीही वारस नोंद करावी, असा विचार पुढे आला.

कूळ वहिवाट कायदा आणि महाराष्ट्र जमीन महसूल कायदा याचा सखोल अभ्यास केला असता, त्यात कुळांसाठी वारसा प्रकरणांची नोंदवही करावी, असे कुठेही नमूद केलेले नाही, किंवा तसे करणे बंधनकारकही नाही.

त्यामुळे आपण वारसांची थेट नोंद करू शकतो. त्यानुसार येत्या आठवडाभरात संपूर्ण राज्यासाठी वारसा प्रकरणांची नोंदवही कार्यरत केली जाणार आहे, त्यानुसार मृत कुळांच्या वारसांची नोंद करता येणार आहे .

कसा होईल फायदा

राज्यात मृत कुळांचे वारस नोंदविलेले नाही असे अनेक प्रकरणे आहेत. अश्या प्रकरणांमध्ये त्या वारसांचे नाव सातबारा उताऱ्यावर नसल्याने त्यावर कर्जाचा बोजा देखील चढविता येत नाही, अश्या परिस्थितीत कर्जही देता येत नाही तसेच अन्य महसुली लाभ सुद्धा देता येत नाहीत. अश्या प्रकारच्या तरतुदीमुळे मंजूर कूळ असूनही अशी व्यक्ती मृत झाल्यास त्यांच्या वारसांना त्यांचे मूलभूत हक्क मिळत नव्हते.

मात्र, आता अशा कुळांना वारस नोंदीनंतर सर्व लाभ मिळतील. त्यात जमीनही ताब्यात मिळेल. त्यावर बोजा चढविणे कर्ज घेणे असे लाभ देखील घेता येतील . अशा वारसांना ही जमीन थेट विकता येत नाही.

मात्र, सातबारावर नोंद झाल्यानंतर कुळकायदा कलम ४३ प्रमाणे वारसाला मालक होता येईल. त्यानंतर त्यासाठीचा जमिनीच्या आकाराचा ४० पट महसूल शासनाला नजराणा स्वरूपात भरून ती विकताही येईल. वासरांच्या नोंदी केल्याने ही एक महत्त्वाची बाब वारसांची खुली होते.

मृत व्यक्तीच्या नावाने कोणताही व्यवहार करणे शक्य नाही, अशा परिस्थितीत वारस नोंद करणे थांबले होते. आता मात्र या प्रक्रियेमुळे वारसांच्या नोंदी होणार आहेत. याचा कुळांना खूप फायदा होईल असे राज्य समन्वयक (ई – फेरफार प्रकल्प) सरिता नरके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *