शेतीशिवार टीम, 19 जानेवारी 2022 : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ नगरपंचायतीचे निकाल देखील आता समोर येऊ लागले आहेत. या नगरपंचायतीकडे राज्याचं लक्ष असण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे 23 वर्षांचे चिरंजीव रोहित पाटील हे या निवडणुकीचं नेतृत्व करताना दिसत होते.
अखेर या निवडणुकीचे जे निकाल जाहीर आले आहेत त्या निकालात रोहित पाटलांनी बाजी मारल्याचं दिसून येत आहे.
संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या कवठेमहांकाळ नगरपंचायतीमध्ये रोहित आर आर पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दणदणीत विजय मिळवला आहे. 17 पैकी दहा जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.
रोहित पाटलांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी कवठेमहांकाळ नगर पंचायत निवडणुकीमध्ये झाली होती. माजी खासदार संजय काका पाटील, शिवसेनेचे नेते माजी मंत्री अजित घोरपडे, राष्ट्रवादीचा एक गट आणि काँग्रेस अशी शेतकरी विकास आघाडी रोहित पाटलांच्या विरोधात होती.
अत्यंत या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये रोहित पाटील यांनी बाजी मारली आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायती वर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. रोहित पाटील यांनी या निवडणुकीमध्ये स्वतः प्रचाराची धुरा सांभाळली होती.