कृषी आयुक्तालयाच्या कृषी सेवकपदाच्या सरळसेवेच्या कोट्यातील 2 हजार 588 रिक्त पदे विचारात घेता, याच्या 80 टक्के म्हणजे 2 हजार 70 पदांच्या भरतीसाठीचा प्रस्ताव शासनाकडे देण्यात आला असून, शासनाची मान्यता प्राप्त होताच जाहिरात व पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली.
चव्हाण म्हणाले, कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त ‘गट – क’ मधील विविध संवर्गातील सरळसेवा पदभरतीबाबत प्रक्रिया सुरू झाला असून, त्याची जाहिरातही प्रसिद्ध केली आहे. तसेच पेसा क्षेत्रातील पदे निश्चित करण्याची कार्यवाहीदेखील अंतिम टप्यात आहे. कृषी विभागाचा सुधारित आकृतिबंध अद्याप अंतिम झाला नसल्यामुळे शासन निर्णयातील तरतुदीनुसार वाहनचालक व ‘गट – ड’ संवर्गातील पदे वगळून इतर सरळसेवा कोट्यातील रिक्तपदांच्या 80 टक्के मर्यादित पदभरती करण्यात येणार आहे.
‘गट – क’ संवर्गातील सरळसेवा पदभरती आयबीपीएस कंपनीमार्फत राबवण्यास शासन मान्यता मिळाली आहे. या संस्थेसोबत सामंजस्य करारदेखील करण्यात आला आहे . त्यानुसार वरिष्ठ लिपिक , सहायक अधीक्षक , लघुलेखक ( निम्नश्रेणी ) व लघुलेखक ( उच्चश्रेणी ) या पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे .
पेसा क्षेत्रातील पदे भरणार..
राज्यपालांच्या 29 ऑगस्ट 2019 च्या अधिसूचनेनुसार अनूसुचित आदिवासी क्षेत्रातील (पेसा) 17 संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्याबाबत कळवण्यात आले आहे. त्यामध्ये कृषी सहाय्यक संवर्गाचा समावेश आहे.
शासन निर्णयानुसार विभागीय कृषी सहसचालक ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर व लातूर या विभागातील पेसा क्षेत्रातील मुख्यालय निश्चिती व पदसंख्या निश्चित करण्याबाबतच्या प्रस्तावाला प्रशासकीय विभागाची पदासाठी मान्यता प्राप्त करून घेण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे जाहिरात देणे शक्य झालेले नाही. मात्र, मान्यता मिळताच भरतीसंदर्भातील पुढील कार्यवाही केली जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले.