कार्तिकी एकादशीला तुळशी विवाह सोहळा घरोघरी पार पडल्यानंतर खऱ्या अर्थाने लग्नसराई सुरू होते. या वर्षी अधिक श्रावणमासामुळे दिवाळी उशिरा आली आहे. त्यामुळे लग्नसराईलाही उशीर होणार आहे. या वर्षी मे महिन्यात लग्नाचे मुहूर्त नसल्याने अनेकांची निराशा झाली आहे.

नोव्हेंबर ते जूनपर्यंत एकूण 66 मुहूर्त आहेत. गतवर्षीपेक्षा या वर्षी गोरज मुहूर्त अधिक असून, 44 गोरज मुहूर्त आहेत. मुहूर्त साधण्यासाठी यजमान मंडळींची घाई सुरू झाली आहे. त्यासाठी सभागृह बुकिंग, वाजंत्री, कॅटरर्स बुकिंग करण्यात येत असून कपडे, दागिने खरेदी सुरू करण्यात आली असून सभागृहावर लग्नाची तारीख निश्चित केली जात आहे.

27 नोव्हेंबरपासून 66 मुहूर्त ..

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तीन मुहूर्त आहेत. दिनांक 27, 28 व 29 या तीन मुहूर्तानंतर डिसेंबरमध्ये 8 मुहूर्त आहेत. नवीन वर्षात मात्र सर्वाधिक मुहूर्त आहेत. जानेवारीत 2, 6, 9, 8, 17, 22, 24, 27, 29 हे 9 मुहूर्त आहेत. नवीन वर्षातील मुहूर्त साधण्याचा प्रयत्न सुरू आहे .

3 मे ते 28 जून एकही मुहूर्त नाही..

3 मे ते 28 जून 2024 पर्यंत लग्नासाठी एकही मुहूर्त नाही. त्यामुळे 56 दिवस मुहूर्त नसल्यामुळे सभागृह, कॅटरिंग तसेच संबंधित व्यावसायिकांचे नुकसान होणार आहे. उन्हाळी सुट्टीत लग्नसमारंभ आयोजित केले जातात; परंतु मुहूर्तच नसल्याने निराशा झाली आहे.

अधिकमासामुळे मुहूर्त लांबले..

या वर्षी श्रावण अधिक मास असल्यामुळे दिवाळीचा सण लांबला. कार्तिकी एकादशीला तुळशी विवाह झाल्यानंतर लग्नाचे मुहूर्त सुरू होतात. त्यामुळे मुहूर्त लांबले आहेत. मुहूर्त साधण्यासाठी गोरज मुहूर्तालाही प्राधान्य दिले जात आहे.

44 गोरज मुहूर्त..

या वर्षी एकूण 44 गोरज मुहूर्त आहेत. मे महिन्यात मुहूर्त नसल्याने गोरज मुहूर्त साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या वर्षी अधिक मासामुळे लग्नाचे मुहूर्त लांबले आहेत. मात्र, गेल्या वर्षी वर्षीपेक्षा लग्नाचे मुहूर्त अधिक असून, गोरज मुहूर्तही अधिक आहेत, अशी माहिती सुहास वैशंपायन यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *