काही काळापासून देशातील रिअल इस्टेट बाजारात मंदीचे आणि अस्थिरतेचे वातावरण मावळत चालले आहे. अशा स्थितीत सरकारच्या नवीन रस्ते प्रकल्पामुळे या परिसरात गुंतवणूक करणे काही प्रमाणात फायदेशीर ठरू शकते. मालत्तेच्या किमतीचा संबंध थेट पायाभूत विकासाशी असतो. ज्या भागात सोयीसुविधांची मुबलकता असते त्या परिसरातील जमिनीच्या, मालमत्तेच्या किमती नेहमीच वधारलेल्या असतात. अशा स्थितीत देशात नवीन रस्त्यांची उभारणी केली जात असताना त्यालगत असलेल्या मालमत्तेच्या किमती दुप्पट, तिप्पट वाढल्या तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या भागात रस्त्याचे काम सुरू असून, प्रस्तावित प्रकल्पाच्या परिसराचे भाव वाढलेले दिसून येत आहेत. तसेच मुंबई – नागपूरला जोडला जाणारा समृद्धी महामार्गदेखील सरकारच्या धोरणाचा भाग आहे. या मार्गाला विरोध होत असला तरी या प्रकल्पामुळे परिसरातील भावही वाढलेले आपल्याला दिसून येताहेत.
एकंदरित चौपदरी, सहापदरी, एक्सप्रेस -वे यासारख्या मार्गाने दोन शहरांदरम्यानच्या परिसराचा विकास होणार आहेच, त्याचबरोबर पडिक जमिनीलादेखील सोन्याचा भाव येणार आहे. अलिकडेच देशात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण झाले आहे आणि टप्प्याटप्प्याने होत आहे.
सरकारने यासंदर्भात अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. बहुउद्देशीय भारतमाला योजनेवरही काम सुरू झाले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दोन शहरांतील अंतर आणि वेळ कमी होणार असून, नागरिकांना ये – जा करणे अधिक सुलभ होणार आहे. ही बाब फायद्याची ठात असताना रिअल इस्टेटवरची मरगळती या प्रकल्पाने दूर होणार आहे. देशातील रिअल इस्टेट बाजार अस्थिर वातावरणातून बाहेर पडला आहे.
केंद्र सरकारच्या भारतमाला योजनेनुसार, देशातील सुमारे 80 शहरांतील रिंगरोड आणि बायपास तयार करण्याची घोषणा सरकारने केली आहे. या योजनेवर युद्धपातळीवर कामही सुरू झाले आहे. प्रकल्प पूर्णत्वास झाल्यानंतर शहरादरम्यानचा प्रवास अधिक सुखकर आणि सुखदायी होणार आहे. फेरीवाल्यांचा अडथळा, वाहतूक कोंडी, वाहनाच्या रांगा यापासून नागरिकांचा सुटका होणार आहे.
जमिनी – फ्लॅटच्या किंमती वाढणार..
ज्या शहरात भारतमाला योजनेशी निगडित काम झाले आहे, त्या परिसरातील मालमत्तेच्या किमतीत भरीव वाढ होत आहे. अशा परिसरात गुतवणूक केल्यास येत्या काही वर्षांत चांगला लाभ पदरात पडू शकतो. जर अगोदरपासूनच या परिसरात कोणाची गुंतवणूक असेल तर काही काळासाठी थांबणे हिताचे ठरू शकते. कारण काही वेळ थांबणे हा आपल्यासाठी आणखी फायद्याचे ठरू शकते.
सध्या देशातील बहुतांशी रिअल इस्टेट मार्केटमधील किमती स्थिर आहेत. जर गुंतवणुकीचा विचार करत असाल तर भारतमाला योजनेशी निगडित असलेल्या शहराची निवड करणे फायद्याचा सौदा ठरू शकता. भारतमाला योजनेतंर्गत देशातील 51 शहरांत बाह्यवळण मार्गाची निर्मिती कला जाणार आहे.
त्यात महाराष्ट्राताल शहराचा उल्लेख करावयाचा झाल्यास सोलापूमध्ये चार बाह्यवळण मार्ग, नांदेडला दोन बाह्यवळण मार्ग, धुळे, जळगाव यांचा प्रमुख शहराचा समावेश आहे. महामार्गांबाबत बोलायचं झाल्यास राज्यातून पुणे – बंगलोर, सुरत – चेन्नई, नागपूर – गोवा शक्तीपीठ, पुणे – छ. संभाजीनगर, नागपूर विजयवाडा अशा मोठ्या एक्सप्रेस – वेंचे जाळे निर्माण होत आहे.
देशभरात 28 शहरांत रिंगरोड तयार करण्याचे काम केले जात आहे. त्यात महाराष्ट्राचा उल्लेख केल्यास पुणे, धुळे, अमरावती, सोलापूर, नागपूर, नाशिक या शहराचा समावेश आहे. तसेच बेळगाव, इंदूर या राज्यालगत शहराचा समावेश आहे. रिंगरोड आणि बायपास झाल्यानंतर शहरातील मध्यवस्तीत होणारी वाहनांची गर्दी कमी राहणार आहे. म्हणूनच हायवेलगत गुंतवणूक करण भविष्यासाठी हिताचे ठरू शकते..