Take a fresh look at your lifestyle.

देशातला सर्वात लांब समुद्री पूल महाराष्ट्रात, 90% काम पूर्ण, ‘ही’ 2 शहरे गाठता येणार फक्त 15 मिनिटात ; ‘या’ दिवशी होणार खुला, मुख्यमंत्र्यांची माहिती..

0

महाराष्ट्र राज्यात सध्या मोठं-मोठे एक्सप्रेस-वे, हायवे, पूल आणि सी लिंकच्या कामांची मोठ्या प्रमाणावर उभारणी करण्याचे काम जोमात चालू आहे. रस्ते वाहतुकीच्या बाबतीत तर विक्रमी रस्ते आणि डोंगरी भागातून तयार केले जाणारे भुयारी मार्ग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. या सर्व रस्ते वाहतुकींमध्ये मैलाचा दगड ठरणार प्रकल्प म्हणजे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा देखील सामान्य नागरिकांमध्ये मोठा चर्चेचा विषय ठरत आहे.

हे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत चालू आहे. अरबी समुद्रामध्ये उभारण्यात येत असलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे काम जवळ-जवळ 90% पूर्ण झालेच आहे. या सी लिंकच्या कामामध्ये 180 मीटरच्या सर्वात लांब अशा ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक स्पॅनची उभारणी करत प्राधिकरणाने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक स्पॅनचे वजन सुमारे 2300 मेट्रिक टन आहे, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या सागरी सेतूमुळे मुंबई ते रायगड जिल्ह्यातील अलिबाग हे अंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटांत पार करता येणार आहे.

महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत बोलताना म्हणाले की, मुंबई ट्रान्स-हार्बर लिंकचे (MTHL) 90% बांधकाम पूर्ण झाले असून, या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल. राज्याच्या अधिकृत वेबसाईटवर असे स्पष्ट करण्यात आले आहे की हा “देशातील सर्वात लांब सागरी पूल तर असणारच आहे, सोबतच ओपन रोड टोलिंग प्रणालीची सुविधा असलेला देखील हा भारतातील पहिलाच पूल असणार आहे. 22 किमी लांबीच्या या पुलाचा तब्बल 16.5 किमीचा भाग अरबी समुद्रात असणार आहे.

पर्यावरणाची घेणार विशेष काळजी

मुंबई-रायगडची कनेक्टिव्हीटी वाढवून दोन्ही शहरांना थेट जोडणारा 6 लेनचा 22 किमी लांबीचा असा हा देशातील पहिला सर्वात मोठा सागरी सेतूमार्ग असणार आहे. या सागरी सेतूवरून दिवसाला किमान एक लाख वाहनांची ये-जा होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या सी लिंकमुळे नागरिकांच्या वेळेची तसेच इंधनाची देखील बचत होईल. या प्रकल्पाची उभारणी करताना हा प्रकल्प प्रदूषणविरहित कसा करता येईल, काम करताना पर्यावरणासोबतच फ्लेमिंगोंची काळजी कशी घेता येईल याची पुरेपूर दक्षता घेण्यात आली आहे.

समुद्री वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी स्पेशल नेव्हिगेशनल स्पॅनची उभारणी.

मुख्य पुलाच्या रचनेमध्ये 60 मीटर लांबीच्या स्पॅनची उभारणी करण्यात आली असून मुख्यतः ते सेगमेंटल बॉक्स गर्डर व कॉक्रिट डेक आहेत. मात्र याचा उपयोग मुंबई पोरबंदर प्रकल्पाचे एक प्रमुख वैशिष्ट्य असलेला सागरी क्षेत्रातील नॅव्हिगेशन भागातील स्टील डेक म्हणून सुद्धा होणार आहे. ज्याला तांत्रिकदृष्ट्या ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक (OSD) असे देखील म्हणतात. समुद्रातील मालवाहू जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी मोठ्या लांबीचे हे स्पॅन समुद्राच्या पाण्याच्या पातळीपासून सुमारे 25 मीटर उंच बांधण्यात येत आहेत. त्यामुळे हा स्पॅन नेव्हिगेशनल स्पॅन म्हणून देखील ओळखला जातो.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पॅकेज 2 मधील एकूण 32 ओएसडी स्पॅनपैकी 15 ओएसडी स्पॅन आधीच स्थापित केले गेले आहेत. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत 180 मीटरचा हा पॅकेज 2 मधील सर्वात लांब ओएसडी स्पॅन स्थापित करण्यात आला.

किती भरावा लागणार टोल..

या पुलावरून प्रवास करण्यासाठी वाहनधारकांडून दोन टप्प्यात टोल वसूल केला जाणार आहे. या पुलावरून प्रवास करण्यासाठी एका कारला 240 रुपये तर मल्टी ॲक्सल वाहनांसाठी 780 रुपये टोल भरावा लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.