DA Hike : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनंतर आता ‘या’ कर्मचाऱ्यांना संक्रातीचं गिफ्ट, DA मध्ये झाली 4% नी वाढ, पहा, पगाराचे कॅल्क्युलेशन..
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात 38% वाढ करून दिनांक 01 जुलै 2022 पासुन सुधारणा करण्याबाबत अखेर वित्त विभागाकडुन दि.10 जानेवारी 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित झाला आहे. आता त्यापाठोपाठ राज्यातील राज्य शासकीय निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांनाही मकर संक्रातीचं मोठं गिफ्ट मिळालं आहे. यांच्याही महागाई वाढीचा दर 34% वरुन 38% सुधारीत करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच आता निवृत्तिवेतनधारकांच्याही पगारात वाढ होणार आहे.
DA वाढी संदर्भातील वित्त विभागाकडुन निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात..
शासन असा आदेश देत आहे की, राज्य शासकीय निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना त्यांच्या मूळ निवृत्तिवेतन / कुटुंबनिवृत्तिवेतनाच्या एकूण रकमेवर दिनांक 01 जुलै, 2022 पासून अनुज्ञेय महागाई वाढीचा दर 34 % वरुन 38 % सुधारीत करण्यात यावा.
सदर महागाई वाढ दिनांक 1 जुलै, 202 पासूनच्या थकबाकीसह माहे जानेवारी 2023 च्या निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतनासोबत रोखीने देण्यात यावी.
प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या महागाई वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्तिवेतन संवितरण प्राधिकारी म्हणजेच यथास्थिती, अधिदान व लेखा अधिकारी मुंबई / कोषागार अधिकारी यांची राहील.
शासन असाही आदेश देत आहे की , ज्यांना निवृत्तिवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी / कृषितर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये यांमधील निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांना वरील निर्णय, योग्य त्या फेरफारांसह लागू राहील.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम 1961 (सन 1962 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 5) च्या कलम 248 च्या परंतुकान्वये प्रदान केलेले अधिकार आणि त्यासंबंधातील इतर सर्व अधिकार यांचा वापर करुन शासन असाही आदेश देत आहे की, वरील निर्णय जिल्हा परिषदांचे निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांनाही लागू राहील.
5. यासंबंधीचा खर्च वरील परिच्छेदांत नमूद केलेल्या निवृत्तिवेतनधारकांची निवृत्तिवेतने ज्या अर्थसंकल्पीय शीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या शीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो त्या – त्या शीर्षांतंर्गत मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.
6. शासनाने वेळोवेळी मंजूर केलेल्या निवृत्तिवेतनावरील महागाई वाढी देण्याबाबतचे सध्या अस्तित्वात असलेले सर्व आदेश, योग्य त्या फेरफारांसह, आता मंजूर केलेल्या महागाई वाढीस देखील लागू राहतील.
पगारात किती होणार वाढ, पहा कॅल्क्युलेशन..
महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ झाल्याने आता निवृत्ति धारकांची रक्कम 18,000 रुपये धरली तर त्याच्या पगारात वार्षिक वाढ 6840 रुपये होणार आहे. या आधी 34% महागाई भत्ता मिळत होता त्यामुळे निवृत्तिधारकांना 34% महागाई भत्त्यानुसार 6120 प्रति महिना मिळत होता.
मात्र, नवीन महागाई भत्ता 38% लागू झाल्यानंतर ही रक्कम 6840 प्रति महिना होणार आहे. याचा अर्थ दरमहिन्याला निवृत्तिवेतनधारक मूळ निवृत्तिवेतन / कुटुंबनिवृत्तिवेतनाच्या पगारात 720 रुपये वाढतील. यानुसार त्याच्या वार्षिक पगारात 8640 रुपयांची भरघोस वाढ होणार आहे.