पुणे कोकण व विदर्भातील अनेक भागांत शुक्रवारी मुसळधार पाऊस पडला, तर काही भागांत अतिवृष्टी झाली. उर्वरित महाराष्ट्रातही ठिकठिकाणी दमदार पावसाची नोंद झाली. राज्यात ऑरेंज, रेड, यलो अलर्ट कायम असून पुढील काही दिवस जोरदार पावसाचा इशारा कायम असल्याची माहिती हवामान विभागाने दिली.
राज्यातील काही भागांत जोरदार पावसाला पोषक हवामान आहे. त्यामुळे बहुतांश भागात पाऊस पडत आहे. कोकण भागातील मुंबई सांताक्रुझ, अलिबाग या ठिकाणी शुक्रवारी सायंकाळपर्यंत अतिवृष्टी झाली असून मुंबईसह राज्यात आज (22 जुलै) सकाळपासूनच पावसाने पुन्हा चांगला जोर धरला आहे. त्याचप्रमाणे विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, गोंदिया, अमरावतीमध्ये जोरदार पाऊस झाला.
मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, महाबळेश्वर या भागात, तसेच मराठवाड्यातील नांदेड, धाराशीव, तसेच काही भागात पावसाचा जोर होता, बहुतांशी भागांमध्ये जोरदार पाऊस पडत असल्याने काही भागांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली. घाटमाथ्यावरही जोरदार पाऊस पडत आहे.
लोणावळा, शिरगाव, शिरोटा, ठाकूरवाडी, वळवण, अम्बोणे, भिवपुरी, दावडी, डुंगरवाडी, कोयना, खोपोली, खंद, ताम्हिणी, भिरा, धारावीमध्ये दमदार पाऊस पडला. राज्यात 22 ते 25 जुलैदरम्यान कोकण ऑरेंज, यलो अलर्ट असून या भागात जोरदार पाऊस तसेच किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशारा आहे.
मध्य महाराष्ट्रात ऑरेंज, रेड अलर्ट तसेच घाट विभागात जोरदार पाऊस पडणार आहे. मराठवाडा विदर्भात यलो अलर्ट असून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
शाळा – महाविद्यालयांना सुट्टी..
पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास शालेय विद्यार्थ्यांना घरी जाण्यास अडथळा निर्माण होवू नये चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये आज बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. पालघर जिल्ह्यातील पावसाचा जोर पाहता सर्व अंगणवाड्या तसेच सर्व सरकारी आणि खासगी शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
राज्यातील पाऊस (मि.मी.मध्ये)
मुंबई 92, सांताक्रुझ 115, अलिबाग 63, रत्नागिरी 7, डहाणू 0.1, पुणे 2.6, लोहगाव 3, कोल्हापूर 2, महाबळेश्वर 39, नाशिक 1, सांगली 1 सातारा 0.6, सालापूर 16 धाराशीव 8. छत्रपती संभाजीनगर 0.5, परभणी 3, नांदेड 33, अकोला 0.6, अमरावती 15, ब्रह्मपुरी 2. चंद्रपूर 50, गोंदिया 13, नागपूर 36, यवतमाळ 60.