गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थितीही निर्माण झाली आहे. मात्र, येत्या काही दिवसांत राज्यातील जनतेला पावसापासून थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात आजपासून राज्यात पावसाचा जोर कमी होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. (Maharashtra Rain)
दुसरीकडे येत्या दोन दिवसांत कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर ऑगस्टचे पहिले दहा दिवसही हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
पालघर, ठाणे, घोडबंदर, नाशिक, नंदुरबार, पुणे, सातारा या घाट भागात पुढील दोन – तीन दिवस हलका पाऊस पडण्याची शक्यता असून, मायानगरी मुंबईतही पावसाचा जोर कमी असणार आहे. मात्र, येत्या 24 तासांत मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
आज कुठे कुठे पावसाची शक्यता..
हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जुलै महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 17 टक्के जास्त पाऊस झाला आहे.
मात्र, राज्यभरातील पावसाचे प्रमाण असमान असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात अजूनही पुरेसा पाऊस नाही तर कोकणात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे या भागात कमी पाऊस झाल्यास काही जिल्ह्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
डिभें धरण 63.57 टक्के भरले संततधार पाऊस..
संततधार पाऊस पडत असल्याने डिंभे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत असून सध्या धरणात 63.57 टक्के पाणीसाठा झाला आहे. गेली आठ दिवसांपासून आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी दुर्गम भागात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून त्यामुळे ओढेनाले दुथडी भरून वाहत आहेत. आहुपे खोऱ्यातून वाहणारी घोड नदी तसेच बुब्रा नदीलाही मोठा पूर झाला आहे. आहुपे आडिवरे असणे माळीण, बोरघर, कुशिरे, मेघोली, तिरपाड आदी आदिवासी गावांच्या परिसरात सूर्य दर्शनही दुर्लभ झाले आहे.
गेल्या २४ तासात धारण क्षेत्रात ७२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 29 जुलै रोजी सायंकाळी सहा पर्यंत धरणामध्ये 299 मिली मीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. धरणाची एकूण क्षमता 13.5 टी.एम.सी.असून सध्या धरणामध्ये 6.57 टी.एम.सी. पाणीसाठा झाला आहे.
धरणक्षेत्रात संततधार पाऊस सुरू असून धरणाचा सुमारे 35 किलोमीटर बॅक वॉटर पाणी साठा गेला असून या परिसरात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे धरणातील पाण्याच्या मोठ्या लाटा अनुभवायास मिळत आहेत.