महाराष्ट्राच्या काही भागात अवकाळी पावसानंतर चक्रीवादळ आलं. या सगळ्यात मान्सून लांबल्याने जनता चिंतेत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) गुरुवारी महाराष्ट्र आणि देशात 23 जूनपासून थांबलेला मान्सूनचा प्रवास पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, मुंबई, कोकणासह विविध ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहेत. त्याचबरोबर ढगाळ वातावरणामुळे मुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात उष्णतेचे प्रमाण वाढल्याने उष्माघातही होत आहे. आज (16) रात्रीपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. आज नंदुरबार, जळगाव आणि धुळे शहरात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस, कुठे राहणार कोरडे ?

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे.

तर सांगली, सोलापूर, बीड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांत हवामान कोरडे राहणार आहे. अशा परिस्थितीत येथील नागरिकांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे.

पावसाच्या प्रतीक्षेत आणखी लागणार आठवडा ?

भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या माहितीनुसार, 18 ते 21 जून दरम्यान नैऋत्य मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. परंतु गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या पुढील चार आठवड्यांच्या अंदाजानुसार 16 ते 22 जून या आठवड्यात राज्यात पावसाची शक्यता कमी आहे. मॉडेलनुसार, 23 जूनपासून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील वेगळ्या भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कधी पडणार पाऊस :-

हवामान खात्याचे अधिकारी अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, अरबी समुद्रात महाराष्ट्र ते केरळपर्यंत दाब निर्माण झाल्याने अरबी समुद्रात मान्सूनला चालना मिळणार आहे. 18 ते 22 जून दरम्यान मान्सून पुणे आणि मुंबईत दाखल होऊ शकतो, परंतु राज्याच्या उत्तरेकडील भागासह विदर्भात मान्सून दाखल होण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हवामान तज्ञ पंजाबराव डंख यांचा काय आहे अंदाज..

सरकारच्या हवामानाच्या इशाऱ्यावर शेतकरी विश्वास ठेवत नाही एवढा विश्वास पंजाब डखांच्या व्हिडीओवर ठेवत असतात अनेकदा तसे झालंही.. पंजाबराव जे बोलले तसे घडत होते. मात्र जून महिन्याच्या अनुषंगाने पंजाब डखांनी व्यक्त केले सर्व अंदाज फेल ठरले.

पंजाबरावांचे 90% अंदाज बरोबर असतात परंतु जून महिन्यामध्ये मात्र त्यांचे सर्व अंदाज 100% चुकले, वर्षभरात पाऊस पडला काय किंवा नाही पडला काय ? याचा फार फरक पडत नाही , परंतु जून महिन्यात पेरणी असते आणि शेतकऱ्यांचे लगबगीचे दिवस असतात. यात अंदाज चुकल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा झाला आहे.

परंतु आता पंजाबराव डंख यांनी नवा हवामान अंदाज आपल्या फेसबुक व्हिडीओ द्वारे प्रसिद्ध केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, राज्यात मान्सूनचं आगमन झालं होतं परंतु अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ गुजरातकडे वळल्यामुळे आपला मान्सून खोळंबला. परंतु आता राज्यामध्ये पुन्हा मान्सून सक्रिय होणार असून आजपासून 18 तारखेपर्यंत जोराचा वारा सुटणार आहे.

तसेच 25 जून पासून महाराष्ट्रात मान्सून पुन्हा प्रगती करणार असून हा पाऊस 15 जुलैपर्यंत टप्प्याटप्याने संपूर्ण महाराष्ट्र्रात धो धो पाऊस पडणार असून हा पाऊस पेरणीपूरक पडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *