आला रे आला मान्सूनचा पाऊस आला..! अहमदनगर, नाशिकसह ‘या’ जिल्ह्यांत 12 ते 15 तारखेपर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस..
नैर्ऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल झाला आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मान्सून रविवारी दुपारी अखेर कोकण भागातील रत्नागिरीत दाखल झाला आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली. केरळात उशिराने मान्सून धडकल्याने महाराष्ट्रातही मान्सून लांबणार असल्याची चर्चा होती.
मात्र, 11 जून रोजी राज्यात मान्सूनने हजेरी लावली. रविवारी कोकणातील काही भाग, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग, संपूर्ण गोवा, कर्नाटक, तामिळनाडू व आंध्र प्रदेशचा काही भाग व्यापला आहे. शिमोगा, हसन या शहरांसह धर्मपुरी, श्रीहरी कोटापर्यंत मान्सून पोहोचला आहे.
केरळमध्ये मान्सून १ जूनला दाखल होतो. त्यानंतर मान्सून राज्यात 7 जूनपर्यंत दाखल होतो. दरवर्षीच्या तुलनेत यंदा अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘बिपरजॉय ‘ वादळामुळे मान्सूनचे आगमन उशिराने झाले.
यंदा केरळमध्ये मोसमी पाऊस उशिराने म्हणजे 8 जून रोजी दाखल झाला होता. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय वादळामुळे मान्सूनच्या आगमनाला उशीर झाला होता. पुढील वाटचालीला पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले होते.
त्यानुसार रविवारी मोसमी वाऱ्यांनी रत्नागिरीत हजेरी लावली. यावर्षी मान्सून चार ते पाच दिवस उशिराने दाखल झाला आहे. दरम्यान, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी 30-40 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
अरबी समुद्रात ‘बिपरजॉय हे अत्यंत तीव्र चक्रीवादळ तयार झाले आहे. सौराष्ट्र, कच्छ किनारपट्टीला चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. हे चक्रीवादळ मुंबईपासून 580 किमी अंतरावर होते. पोरबंदर, देवभूमी द्वारकेच्या दक्षिण – नैऋत्येस 530 किमी, नलिया आणि कराची (पाक) च्या दक्षिणेस 780 किमी अंतरावर आहे.
14 तारखेपर्यंत ते जवळजवळ उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाचा परिणाम अरबी समुद्रावर झाला असून किनारपट्टी भागात लाटा उसळल्या असून सोसाट्याचा वारा वाहत आहे.
काही भागांत मान्सूनपूर्व पाऊस..
रविवारी मान्सून दाखल झाल्यामुळे राज्याच्या विविध भागांत पावसाला अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. कोकणातील पालघर, ठाणे आणि मुंबई, खान्देश विभागातील नंदूरबार, धुळे, जळगाव आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, सोलापूर, मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, विदर्भ विभागातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मात्र विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती, वर्धा या विदर्भातील तीन जिल्ह्यात उष्णतेची लाट येईल असा अंदाज आहे.
दरम्यान , रविवारी राज्याच्या काही भागांत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला असून किनारपट्टीवर लाटा उसळत आहेत. मान्सून दाखल झाल्यामुळे रत्नागिरी भागात पावसाच्या सरी पडल्या आहेत. कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही भागात तुरळक ठिकाणी
विजांच्या कडकडाटासह वादळ आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे.
रविवारी सायंकाळपर्यंत रत्नागिरीमध्ये 0.1 मिमी , सांगली 2 तर महाबळेश्वरमध्ये २ मिमी पावसाची नोंद झाली आहे. राज्याच्या काही भागात तीव्र उकाडा आहे. राज्यात सर्वात जास्त तापमानाची नोंद वर्ध्यामध्ये 43.5 अंश सेल्सिअस तर सर्वात कमी तापमान महाबळेश्वरमध्ये 18 अंश सेल्सिअस इतके नोंदवले आहे.
येत्या 12 ते 15 जूनदरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊन पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात याच दरम्यान उष्णतेची लाट, मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस तसेच सोसाट्याचा वाराही वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.