मुंबईकरांसाठी खुशखबर ! देशातला पहिला समुद्री रस्ता होणार खुला, सर्वात रुंद लिंक रोडचेही होणार भूमिपूजन, पहा खासियत..
10 वर्षांहून अधिक काळ वाट पाहणाऱ्या मुंबईकरांच अखेर स्वप्न पूर्ण होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारीला दोन मोठ्या रस्त्यांचे उद्गाटन करणार आहे. वरळीच्या बिंदू माधव चौक ते मरीन ड्राईव्ह या 9 किमी लांबीच्या कोस्टल रोडच्या भागाचे उद्घाटन होणार असून पश्चिम आणि पूर्व मुंबईला जोडणाऱ्या गोरेगाव – मुलुंड लिंक रोडचे भूमिपूजनही होणार आहेत.
मरीन ड्राईव्ह ते वरळी असा 10.58 किमी लांबीचा किनारी रस्ता मे 2024 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. कोस्टल रोड सुरू झाल्याने मुंबईकरांना वाहतूककोंडीपासून बऱ्याच अंशी दिलासा मिळणार आहे. यावर ताशी 80 किमी वेगाने वाहने चालवता येणार आहे. 19 फेब्रुवारी रोजी कोस्टल रोडचा एक भाग खुला केला जाणार असून जो वरळीहून मरीन ड्राइव्हच्या दिशेने येईल. भविष्यात, मरीन ड्राइव्ह ते वरळी मार्गे वांद्रे – वर्सोवा, वर्सोवा ते दहिसर आणि मीरा – भाईंदर असा मार्ग उपलब्ध होणार आहे.
सर्वात आनंदाची बातमी म्हणजे कोस्टल रोड हा टोल फ्री असून त्यावरून प्रवास करणाऱ्यांना टोल भरावा लागणार नाही. बीएमसीच्या 2024 – 25 या वर्षाच्या बजेटमध्ये कोस्टल रोडसाठी 2900 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे..
गोरेगाव – मुलुंड लिंक रोड 4 वर्षात बांधला जाणार..
पश्चिम मुंबईला पूर्व मुंबईशी जोडण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या गोरेगाव – मुलुंड लिंक रोडचे भूमिपूजनही पंतप्रधान मोदी करणार आहेत. हा लिंक रोड तीन टप्प्यात बांधण्यात येत आहे. त्याचे संपूर्ण काम मे 2024 ते ऑक्टोबर 2028 दरम्यान 6 टप्प्यांत पूर्ण केले जाईल. यंदाच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी 1870 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या 12.20 किलोमीटर लांब आणि 45.70 मीटर रुंद लिंक रोडच्या बांधकामासाठी 8 हजार 137 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
या लिंक रोड अंतर्गत नाहूर येथील रेल्वे मार्गावर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. यावर्षी मे महिन्यात तो वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. तसेच गोरेगाव पूर्वेतील सुमारे दीड किमी लांबीचा उड्डाणपूल ऑक्टोबर 2024 मध्ये बांधण्यात येणार आहे. खिंडीपाडा, नाहूर येथील तानसा पाइपलाइन उड्डाणपूल, जीजी सिंग रोडवरील रोटरी मार्ग आणि हेडगेवार जंक्शन मुलुंड पश्चिम उड्डाणपुलाचे काम जानेवारी 2025 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. गोरेगाव पूर्वेतील दीड किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे आणि गोरेगावमध्येच 4.7 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम ऑक्टोबर 2028 पर्यंत पूर्ण होईल, यामुळे 1 तासाचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत पूर्ण होईल..
तब्बल 39,000 कोटींचा असणार कोस्टल रोड.
वेस्टर्न एक्स्प्रेस वे आणि SV रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी BMC ने वर्सोवा – दहिसर कोस्टल रोड तयार करण्याची योजना आखली आहे. त्यासाठी नुकतीच 16 हजार कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली. यात दहिसर – मीरा – भाईंदर एलिव्हेटेड कॉरिडॉर जोडून, BMC ने आता 35,955 कोटी रुपये खर्च करण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.BMC चे अतिरिक्त आयुक्त पी वेलारासू म्हणाले की, प्रकल्पातील ही वाढ निविदेच्या सुमारे 70 टक्के आहे. हा प्रोजेक्ट मुलुंड आणि ठाण्यालाही जोडला जाणार आहे..
मुंबईत एरिया ट्रॅफिक कंट्रोल..
वाहतूक नियंत्रणासाठी BMC एरिया ट्रॅफिक कंट्रोल तयार करणार आहे. बीएमसीने 2007 – 08 मध्ये 258 जंक्शन सिग्नलवर इंटेलिजेंट ट्रॅफिक सिग्नल सुरू केले होते. आता BMC नवीन जंक्शनवर आधुनिक सिग्नल बसवणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात 3200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
लवकरच संपणार प्रतीक्षा..
मुंबईकर बऱ्याच दिवसांपासून कोस्टल रोडची वाट पाहत आहेत. त्यामुळे BMC निवडणुकीपूर्वी त्याचा एक भाग सुरू करणार आहे. मात्र, संपूर्ण कोस्टल रोड कार्यान्वित होण्यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. बीएमसीला निवडणुकीपूर्वी कोणत्याही किंमतीत तो सुरू करायचा होता. कोस्टल रोड हा मुंबईच्या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टपैकी एक आहे. दक्षिण मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्यांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय त्याच्या विस्तारामुळे दक्षिण मुंबई ते उपनगरातील अंतरही कमी होणार आहे. याशिवाय मुंबईला लागून असलेला मीरा – भाईंदरही या कोस्टल रोडच्या विस्तारीकरणातून जोडला जाणार आहे.