ठाणे ते मुंबई उपनगरांना जोडणाऱ्या मेट्रो मार्गाच्या बांधकामाचा लवकरच श्रीगणेशा होणार आहे. मेट्रो 10 कॉरिडॉरच्या प्रस्तावाला सरकारने 2019 मध्ये मंजुरी दिली होती. शासन मान्यता मिळून जवळपास तीन वर्षे उलटली तरी या मेट्रो मार्गाचे काम सुरू झालेलं नव्हतं. हे सुरू करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) वन मंजुरी आणि वन्यजीव मंजुरी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक होतं.
आता विभागांकडून हिरवा कंदील मिळाला असून मेट्रो 10 कॉरिडॉर मार्गावर बांधकाम सुरू होणार आहे. MMRDA ने संबंधित विभागाकडून आवश्यक परवानगी घेण्यासाठी सल्लागाराची मदत घेण्याचा निर्णय असून MMRDA च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सल्लागार आवश्यक कागदपत्रे तयार करण्यास मदत करेल आणि वन मंजुरी आणि वन्यजीव मंजुरी मिळविण्यासाठी सूचना देणार आहे.
मेट्रो 10 घोडबंदर रोडला जोडली जाणार..
ठाण्यातील घोडबंदर रोड ते मीरा रोडच्या शिवाजी चौकापर्यंत मेट्रो 10 कॉरिडॉर बांधण्यात येणार आहे. हा 9.2 किमी लांबीचा कॉरिडॉर वनक्षेत्राच्या जवळून जातो. यामुळे या मार्गावर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करताना वनविभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. जंगलाला लागून असल्याने या रस्त्यावर वन्य प्राणीही येत असल्याच्या बातम्या येत आहेत.
यामुळे सरकारने पर्यावरण आणि जंगले लक्षात घेऊन मेट्रो मार्ग तयार करण्याचा आराखडा तयार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी मेट्रो 10 ची पायाभरणी केली होती. या कॉरिडॉरच्या मार्गावर एकूण चार उन्नत स्थानके असतील. गायमुख, गायमुख रेतीबंदर, वर्सोवा चार फाटा, काशिमीरा आणि शिवाजी चौक..
Mumbai – Thane Metro चे संपूर्ण मॅप पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा
मेट्रोचे फायदे..
सध्या ठाणे ते मीरा रोड हा प्रवास रस्त्याने पूर्ण होतो. घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडीमुळे गर्दीच्या वेळेत काही मिनिटांचा प्रवास पूर्ण करण्यासाठी अनेक तास लागतात. मेट्रो सेवा सुरू झाल्याने ठाण्यातून मीरा रोडला अवघ्या 15 ते 20 मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे. गेल्या काही वर्षांत घोडबंदर रोडवर वेगाने बांधकामे सुरू आहेत. महानगरातील घरांच्या किमती गगनाला भिडल्याने उपनगरातील या भागांमध्ये मोठ्या संख्येने लोकांनी घरे घेतली आहेत.
मुंबईच्या प्रत्येक भागात पोहोचणे होणार सोपं..
मेट्रो 10 कॉरिडॉर घाटकोपर – मुलुंड – ठाणे – कासारवडवली मेट्रो 4 कॉरिडॉरला देखील जोडला जाईल. मेट्रो 4 घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान धावणाऱ्या मेट्रो 1 शी जोडली जाईल. त्याच वेळी, मेट्रो 4 इतर मेट्रो मार्गांशी देखील जोडली जाईल. अशा परिस्थितीत मेट्रोच्या माध्यमातून प्रवाशांना मुंबईच्या प्रत्येक भागात सहज पोहोचता येणार आहे.
मुंबई मेट्रो – 10
गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड)
– 9.209 किलोमीटर
– 4,476 कोटी रुपये खर्च
– 4 उन्नत स्थानके
मुंबई मेट्रोची ही स्थानके राहणार..
गायमुख
गायमुख रेतीबंदर
वर्सोवा चार फाटा
काशीमीरा
शिवाजी चौक