IMD Alert : पुढील 48 तासांत सोसाट्याच्या वाऱ्यासह ‘या’ जिल्ह्यांत ढगफुटी, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी!
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याने येत्या 48 तासांत कोकण, ठाणे, मुंबई, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी ढगफुटी सह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यावेळी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तर मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण आणि गोवा किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या 24 तासांत राज्यात सर्वाधिक धारावीमध्ये 129 मिमी पाऊस पडल्याची नोंद हवामान विभागाने केली आहे. त्याखालाखाल गरवाडी 71 मिमी, ताम्हिणी घाट परिसरात 40 मिमी, कोयना परिसरात 37 मिमी, भिरा 37 मिमी, शिरगाव 36 मिमी, खोपोली 30 मिमी, खंड 30 मिमी, दावडी 27 मिमी, अंबोने 20 मिमी, भिवपुरी 18 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
लोणावळ्यात सर्वाधिक पाऊस..
पुणे जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वतर्वण्यात आली आहे. तर घाटमाथ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात लोणावळ्यात सर्वाधिक 28.0 मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. त्याखालोखाल लवासा 14.0 मिमी, लवळे 12.5 मिमी, गिरिवन 4.0 मिमी, पुरंदर 2.0 मिमी, डुडुळगाव 1.5. मिमी, तळेगाव 1.5 मिमी, पाषाण 0.5 मिमी, निमगिरी 0..5 मिमी आणि शिवाजीनगरमध्ये 0.3 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
रायगडसह या जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट..
रायगड, रत्नागिरी, जिल्ह्यासाठी गुरुवार, 6 जुलै रोजी भारतीय हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. त्याची पूर्वसूचना हवामान विभागाकडून रायगड जिल्ह्यासाठी देण्यात आली आहे.
यात त्यांनी जिल्ह्यातील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून सर्व नागरिकांना व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
दरडग्रस्त, पूरप्रवण, खाडीलगत सखल भागातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. पुलावरून पाणी वाहत असल्यास धाडसाने वाहने पाण्यातून चालवू नये. मासेमारीसाठी खाडी, तलाव, समुद्रात जाऊ नये, अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत.