महाराष्ट्रातील मुंबईत टाकल्या जाणार्या मेट्रो नेटवर्कमधील सर्वात मोठी अंडरग्राउंड मेट्रो लाइन – 3 आता लवकरच सुरु होणार आहे. यामुळे मुंबईकरांना केवळ चौथा प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार नाही, तर मुंबईच्या अगदी दक्षिणेकडील टोकापर्यंत प्रवास करता येणार आहे.
या बहुप्रतीक्षित मेट्रो 3 अंडरग्राउंड कॉरिडॉरची पहिली लॉन्ग डिस्टन्स ट्रायल यशस्वी पार पडली. मेट्रो ट्रेनने MIDC ते विद्यानगरी या 8 किलोमीटर मार्गावरील 6 स्टेशन्स पार केली. त्यानंतर सीप्झ (Seepz) स्टेशनवर परत येत मेट्रोने जवळपास 17 कि.मी अंतराची टेस्ट पूर्ण केली.
सध्या मुंबईच्या लोकल ट्रेनला मुंबईची लाईफलाइन म्हटले जाते. डहाणू, कर्जत, कसारा आणि पनवेलसह पश्चिम, पूर्व आणि नवी मुंबईच्या उपनगरांसह दुर्गम स्थानकांमधून प्रवासी या लाइफलाइनद्वारे मुंबईत पोहोचत आहेत, परंतु या सर्व उपनगरीय रेल्वे मार्ग मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस (CSMT) आणि दक्षिणेकडील चर्चगेट पर्यंत समाप्त होतात.
यापलीकडे मुंबईकरांना कफ परेडला जाण्यासाठी टॅक्सी किंवा बसने जावे लागते, परंतु मुंबई मेट्रो लाइन -3 केवळ मुंबईच्या मध्यभागातून जाणार नाही आणि अनेक महत्त्वाची कामाची ठिकाणे, महाविद्यालये, रुग्णालये जोडणार नाही तर ती मुंबईचे दक्षिण टोक कुलाब्यालाही जोडली जाणार आहे. आरे कॉलनी ते वांद्रे (BKC) या मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा डिसेंबर 2023 मध्ये सुरु करण्याची मेट्रो प्राधिकरणाची योजना आहे. आणि दुसरा टप्पा आरे कॉलनी ते कफ परेड 2024 च्या मध्यापर्यंत सुरू होईल, असा विश्वास प्राधिकरणाने व्यक्त केला आहे.
फक्त एकचं स्टेशन असणार जमिनीवर..
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे (MMRCL) संचालक (प्रकल्प) एसके गुप्ता यांच्या मते,सुमारे 38,000 कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या मुंबई मेट्रो-3 प्रकल्पाची एकूण लांबी 33.5 किमी असेल. हा मेट्रो मार्ग पूर्णपणे अंडरग्राउंड असून 27 पैकी 26 स्टेशन अंडरग्राउंड असतील, फक्त एक स्टेशन जमिनीच्या वर असेल. ही मेट्रो कुलाबा ते सीप्झ हे अंतर एका तासात पूर्ण करेल. ही मेट्रो नरिमन पॉइंट, कफ परेड, फोर्ट, लोअर परेल, बीकेसी आणि SEEPZ सारख्या व्यस्त भागांना जोडली जाणार आहे.
मुंबई मेट्रोचा संपूर्ण रूट मॅप पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा
परंतु सध्या या वर्षाअखेरिसपर्यंत MMRCLआरे ते बीकेसी (BKC) या 12 किमी लांबीच्या टप्प्यात 110 सेवा चालवण्याची योजना आखत आहे, प्रवासाचा कालावधी 25 मिनिटांचा आहे.
ही असणार 10 स्टेशन्स..
आरे, सीप्झ, MIDC, मरोळ नाका, इंटरनॅशनल एअरपोर्ट, सहार रोड, डोमॅस्टिक एअरपॉर्ट, सांतक्रुझ, विद्यानगरी, BKC, अशी पहिल्या टप्प्यात 9 स्टेशन्स अंडरग्राउंड असतील.
दररोज 17 लाख प्रवाशांची वाहतूक होणार सुकर..
मुंबईच्या दक्षिण टोकापासून उत्तरेकडील पूर्व आणि पश्चिम उपनगरांदरम्यान असलेल्या SEEPZ आणि आरे कॉलनीला जोडणारा हा मेट्रो मार्ग दररोज 17 लाख प्रवाशांची वाहतूक सुलभ करेल अशी अपेक्षा आहे. सध्या त्याचे 90.6 टक्के काम पूर्ण झाले आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबईतील ज्या भागातून उपनगरीय गाड्या जात नव्हत्या तेही प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत..